Pune: गावे वगळल्यानंतर पाण्याचे टँकरही कमी

फुरसुंगी – फुरसुंगी-उरुळी देवाची कचरा डेपोबाधित घुलेवस्ती, गणेशनगर, उत्तमनगर, पॉवरहाऊस, रेल्वेस्टेशन या परिसरातील विहिरी, कुपनलिका असे जलस्त्रोत गेल्या 12 वर्षांत दूषित झाले आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना महापालिकेकडून पुरवठा होणाऱ्या टँकरवरच अवलंबून रहावे लागते, पालिकेतून ही गावे वगळल्याने पालिकेकडून या भागात पाठविल्या जाणाऱ्या टँकरची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे धरण भरूनही शहरालगतच्या या भागात पाणी टंचाई जाणवत आहे.
महापालिका समावेशानंतर गावांची पिण्याच्या पाणी टंचाईचा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा असताना गेली कित्येक वर्षे हा प्रश्न कायम आहे. गाव पालिकेत असतानाही पाणी मिळत नव्हेत आता तर गाव वगळले असल्याने पालिका प्रशासनाकडून या गावांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
महापालिकेने जून 2010 पासून उरुळी देवाची-फुरसुंगी कचरा डेपोत ओपन डंपिंग बंद करून या भागाचा विकास करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, त्यानुसार कुठलेही काम सुरू करण्यात आले नाही. नागरिकांनी आंदोलने केल्यानंतरही पालिका प्रशासनाकडून पाणीपुरवठा योजना, पुरवठा याबाबत केवळ कोरडी अश्वासनेच नागरिकांना मिळाली. कचरा डेपो परिसरातील नागरिक दुर्गंधी, डास, माशा, रोगराई, आरोग्यास घातक दूषित दूर्गंधीयुक्त काळेपाणी यातून त्रस्त आहेत.
महापालिकेकडून या भागात अद्याप कोणतीही ठोस विकासकामे करण्यात आलेली नाहीत. हा परीसर पालिकेकडून कायमच दुर्लक्षित आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. महापालिका प्रशासनाने कचरा डेपोबाधित भागाला पुरेसा व नियमित पाणीपुरवठा करून ठप्प विकासकामे सुरू करावीत, अशी मागणी नागरीकांनी केली आहे.
चौकट –
यामुळे पाण्याचे टँकर कमी…
पाणी टंचाई असलेल्या परिसरातील नागरिक दिवसभर सर्व काम-व्यावसाय सोडून महापालिकेच्या पाण्याच्या टँकरची वाट पाहात असतात. परंतु, या भागातील हॉटेल्स, ढाबे, विविध कंपन्यांची गोदामे, कंपन्यांच्या टाक्या भरून देताना अधिक पैसे मिळतात म्हणून असे टँकर तिकडे जात आहेत. याच कारणातून टँकरचे पाणीही योग्य प्रमाणात उपलब्ध होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.





