Pune : पाणी रस्त्यांवर; खापर मात्र गाळ-कचऱ्यावर

पुणे – गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने शहरातील रस्त्यांना पुन्हा तळ्याचे स्वरूप आले. पाणी साठणाऱ्या ठिकाणी मागील वर्षी लाखो रुपये खर्चून काम करण्यात आले होते. पण, यंदा तीच स्थिती उद्भवली आहे. पावसाळी चेंबरमध्ये असलेला कचरा, गाळामुळे पाणी साचल्याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.
निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने यंदा मार्चमध्येच नालेसफाई तसेच पावसाळी वाहिन्या सफाईची निविदा काढली. दरवर्षी एप्रिलअखेरीस सुरू होणारे काम यंदा मार्च अखेरीसच सुरू करण्यात आले. त्यानंतर ते रखडल्याने आयुक्तांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.
आता मे अखेरीस आयुक्त राजेंंद्र भोसले यांनीच ८० ते ८५ टक्के पावसाळी कामे पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. पण, अवकाळी पावसाने शहरातील रस्त्यांवर निर्माण झालेली तळी पाहता यंदाही पुणेकरांना पावसाळ्यात पाण्यातूनच वाट काढावी लागणार असल्याचे चित्र आहे.
२५ ठिकाणांचा आढावा
शहरभर सर्वत्र पाणी साचल्यानंतर मनपा पथ विभाग आणि ड्रेनेज स्वच्छता विभागाने अशा सुमारे २५ ठिकाणांचा आढावा घेतला. त्यात पावसाळी चेंबरमध्ये असलेला गाळ, कचरा आणि झाडांचा पालापाचोळा वाहून आल्याने पाणी तुंबल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे एका बाजूला पावसाळी चेंबरची सफाई झालेली नसल्याने ही स्थिती उद्भवलेली असताना पावसामुळे कचरा आणि वाहून आलेल्या मातीवर खापर फोडण्यात आले आहे.
“मागील आठवड्यात ज्या-ज्या भागात पाणी साठले, त्या भागाची संयुक्त तपासणी पथ विभाग आणि ड्रेनेज विभागाने केली आहे. कचरा आणि मातीमुळे पाण्याला अडथळा झाला आहे. त्यामुळे त्या भागात स्वच्छता करण्यात आली आहे.” – गणेश सोनुने, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी





