पुणे – वारजे जलकेंद्र अखत्यारितील चांदणी चौक टाकीच्या मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम गुरुवारी करण्यात आले. मात्र, काम अपूर्ण राहिल्यामुळे शुक्रवारीही (ता. १८) सकाळी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी पाणी नसल्याने बाणेर, पाषाण, सूस, वारजे भागात जवळपास पाच ते सहा लाख नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तर सलग दोन दिवस पाणी न आल्याने अनेकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागली असून, नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. महापालिकेकडून या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी गुरुवारी पाणी बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर, या जलवाहिनीचे काम शुक्रवारी पहाटेपर्यंत सुरू होते. ते काम संपल्यानंतर सकाळी सात वाजता या जलवाहिनीतून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, लगेचच दुसरीकडे जलवहिनी फुटली. त्यामुळे शुक्रवारी सकाळी पुन्हा पाणी बंद करावे लागले, तर हे काम शुक्रवारी संध्याकाळपर्यंत सुरू राहिल्याने नागरिकांना सलग दोन दिवस पाणीच मिळाले नाही. त्यामुळे जलकेंद्रातून पाणी पुरवठा होणाऱ्या अनेक भागांतील नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. यामुळे महापालिकेकडून मागणी आलेल्या भागात टॅंकरने पाणी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच, पर्यायी भागातून पाणी देण्यात आले. त्यामुळे इतर भागावर त्याचा परिणाम झाला. या भागात दुसऱ्या दिवशीही पाणी बंद चांदणी चौक (चौकोनी) टाकी परिसर, पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड परिसर, कोथरे वस्ती, सेंटिन हिल सोसायटी, मधुबन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी, डावी भुसारी कॉलनी, चंडवली भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेशनगर, सूरजनगर, सागर कॉलनी, भारतीनगर, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतिबेन सोसायटी परिसर, डुक्करखिंडी परिसर, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंसनगर, बाणेर, बालेवाडी, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निळूभाऊ मळा, लहान्या तांडा, मोहननगर, सूस रोड, धनकुडे वस्ती, पंचवटी, म्हाळुंगे, सूस आणि परिसर.