Pune: जलसंपदा, मनपा आरोपींच्या पिंजऱ्यात; पुण्यातील पूरस्थितीबाबत खासदार सुळे यांची टीका

पुणे – जलसंपदा विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वय नसल्यामुळेच पावसात नदीकाठच्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. तसेच बाधित कुटुंबीयांना सरकारने तातडीने मदत पुरवावी, अशी मागणीही सुळे यांनी केली.
बुधवारी आणि गुरुवारी पुणे आणि आसपासच्या परिसरात झालेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक नागरिकांचे हालही झाले. या पार्श्वभूमीवर सुळे या भागातील नागरिकांची भेट घेतली. तसेच त्यांच्या समस्या जाणून घेत सरकारने या अडचणीच्या काळात कसलेही राजकारण न करता नागरिकांना तातडीची मदत करावी, अशी मागणी केली.
सरकारने राजकारण बाजूला ठेऊन या भागासाठी विशेष पॅकेज द्यावे तसेच या प्राधान्याने सफाई काम हाती घ्यावी. पूर स्थिती ओसरल्यानंतर अस्वच्छता वाढून या भागात रोगराई पसरू शकते हे लक्षात घेऊन तात्काळ डास आणि अन्य विषाणू प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.





