Pune : नगरपालिकेमध्येही पाणी मीटर बसवावेत- जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

पुणे : नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांना आवश्यक प्रमाणात पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी नियोजन करावे. सुरळीत पाणी पुरवठ्यासंदर्भात पाणीमीटर बसविण्याची कार्यवाही करावी. १०० टक्के मीटरींग करुन घ्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सर्व नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी यांना दिल्या आहेत. पाणीमीटर बसविल्याने पाण्याचा अपव्यय टळेल व पाणी बचत होईल, असा विश्वासही डुडी यांनी व्यक्त केला.
मुख्याधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी या सूचना दिल्या. नगरपरिषद क्षेत्रात अर्बन हेल्थ सेंटर उभारण्यात यावेत यासाठी सध्या तात्पुरत्या स्वरुपात जागा उपलब्ध करुन घ्यावी. अर्बन हेल्थ सेंटरमध्ये चांगली सुविधा देण्याच्यादृष्टीने दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे आपला दवाखाना या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी.
नगरपरिषद क्षेत्रात आदर्श शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. नगरपरिषदेच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी शहरातील मालमत्ता कर वसुलीसंदर्भात ड्रोनद्वारे सर्वेक्षण करुन १०० टक्के मालमत्ता कराची आकारणी करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.





