पुणे – पुणे शहरासाठी खडकवासला आणि भामा आसखेड धरणांतून पाणीपुरवठा केला जात असताना, त्यातील पाण्याची गळती ४० टक्क्यांवर पोहचली होती. मात्र, समान पाणी पुरवठा योजने अंतर्गत राबविलेल्या उपाययोजनांमुळे ही गळती आता ३२ टक्क्यांवर आली आहे. २०२५-२६ या वर्षासाठी महापालिकेने तयार केलेल्या पाणी अंदाजपत्रकात ही बाब नमूद करण्यात आली आहे. समान पाणी योजनेत बदलण्यात आलेल्या जलवाहिन्या, पाणी मीटर बसविण्यात आल्याने वापरावर आणता आलेले नियंत्रण तसेच, सर्व भागात पाणी देण्यासाठी योग्य पद्धतीने करण्यात आलेले नियोजन यामुळे महापालिकेस काही प्रमाणात का होईना, पण गळती कमी करता आली आहे. महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार दरवर्षी पाण्याचे अंदाजपत्रक तयार करून पाटबंधारे विभागाला सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार, महापालिकेने यंदा ८१.६४ लाख लोकसंख्येसाठी २१.०३८ टीएमसी पाण्याची मागणी करण्याचे नियोजन केले असून, ती मागणी पाटबंधारे विभागाकडे सादर होणार आहे. गेल्यावर्षी २१.४८ टीएमसी पाण्याची मागणी केली होती. तर, पाटबंधारे विभागाकडून महापालिकेस १४.८२ टीएमसी पाणीसाठा मंजूर केला होता. मात्र, यंदा पाण्याची मागणी महापालिकेनेच कमी केल्याने तसेच, प्राधिकरणाने महापालिकेकडून गावांना देण्यात येणारा पाणीकोटा वाढविण्याच्या सूचना केल्याने यंदा शहरासाठी जादा पाणी मिळण्याची महापालिकेस अपेक्षा आहे. मागील वर्षाच्या तुलनेत मागणी घटली २०२४-२५ मध्ये २१.४८ टीएमसी पाण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात पाटबंधारे विभागाकडून केवळ १४.८२ टीएमसी पाणी मंजूर झाले होते. यंदा मागणी ०.४५ टीएमसीने कमी करून २१.०३८ टीएमसीवर आणण्यात आली आहे. ही मागणी आयुक्त नवल किशोर राम यांच्या स्वाक्षरीनंतर जुलै अखेरीस पाटबंधारे विभागाकडे सादर होणार आहे. त्यामुळे पाटबंधारे विभाग शहरासाठी यंदा किती पाणी देणार यावर महापालिका शहरासाठी पुढील वर्षभराच्या पाण्याचे नियोजन निश्चित करणार आहे. अशी आहे महापालिकेची मागणी अंदाजे पाण्याचा वापर (टीएमसीमध्ये) * नियमित वापर : ११.३४० * टँकर : ०.१९३ * थेट जलवाहिनीतून : १.२८३ * समाविष्ट गावांसाठी : ०.९७५ * तरंगती लोकसंख्या (३.८८ लाख) : ०.१७५ * व्यावसायिक वापर : ०.३४२ * पाण्याची गळती (३२%) : ६.७३ एकूण मागणी २१.०३८ टीएमसी