पुणे – महापालिकेने उभारलेल्या कृत्रिम हौदात मूर्ती विसर्जन केल्यानंतरचे पाणी, माती जवळच्या मोकळ्या जागेत टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे गणेशमूर्तींच्या मातीचे अंश, रंग व पाणी नागरिकांच्या पायाखाली येत असून, त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. न्यायालयाच्या निर्देशांनुसार वाहत्या पाण्यात मूर्ती विसर्जनास बंदी घालून पालिकेने ठिकठिकाणी हौद उभारले आहेत. त्यामध्ये विसर्जित केलेल्या मूर्ती काही वेळाने काढून वाघोली येथील खाणीत पुनर्विसर्जनासाठी नेल्या जातात. मात्र, हौदातील पाणी उघड्यावर टाकले जात असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. शहराचे ग्रामदैवत मानल्या जाणाऱ्या श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी याबाबत महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांना निवेदन देऊन तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे. सिंहगड रस्त्यावरील सनसिटी आनंदनगर परिसरात हा प्रकार पाहण्यात आला. तो वेदनादायी असून धार्मिक भावना दुखावणारा आहे. त्यामुळे हौदातील पाणी व माती सन्मानपूर्वक व योग्य पद्धतीने व्यवस्थापित करावी, अशी मागणी शेटे यांनी केली. दरम्यान, या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून संबंधित ठिकाणी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद दिली असून, पाणी टाकलेला भाग स्वच्छ केल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी स्पष्ट केले.