Pune Water Cut: पाणी कपातीने झाली बोअरवेलची आठवण! सोसायट्यांमध्ये धावपळ; पुणेकरांना बसतोय हजारो रुपयांचा फटका
Pune Water Cut: वापराअभावी बंद पडलेल्या बोअरवेल पुन्हा जिवंत करण्याचे आव्हान; तात्पुरत्या पाण्याच्या टाक्या बसवण्यासाठी सोसायट्यांना आर्थिक भुर्दंड.

Pune Water Cut – शहरात सोमवारपासून दिवसाआड पाणी कपात सुरू झाल्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली असून, पाण्यासाठी आता सोसायट्यांची पावले वर्षानुवर्षे बंद असलेल्या बोअरवेलकडे वळली आहेत. अनेक सोसायट्यांच्या इमारतींची बांधकामे सुरू करण्यापूर्वी बांधकाम व्यावसायिकांकडून पाण्याचा स्रोत म्हणून बोअरवेल घेतल्या होत्या. मात्र, गेल्या काही वर्षांत महापालिकेकडून मुबलक पाणी मिळत असल्याने या बोअरवेल वापराअभावी बंद होत्या.
आता पाणी कमी पडू लागल्याने त्या पुन्हा सुरू करण्यासाठी शहरभर सोसायट्यांची धावपळ सुरू झाली आहे. महापालिकेचे पाणी प्रामुख्याने पिण्यासाठी वापरून इतर गरजांसाठी बोअरवेलचे पाणी उपलब्ध झाले, तरी मोठा दिलासा मिळणार असल्याने या बंद पडलेल्या बोअरवेल पुन्हा सुरू केल्या जात असल्याचे चित्र शहरभर दिसत आहे.
वापराअभावी बंद
शहराच्या जुन्या हद्दीत, तसेच प्रामुख्याने पेठा परिसरात आणि २०१७ पूर्वी नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये सिंहगड रस्ता, कोथरूड, कात्रज, धनकवडी, शिवाजीनगर, औंध, पाषाण, नगर रस्ता परिसरातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू करण्यापूर्वी बोअरवेल घेतल्या जात होत्या. महापालिकेचा पाणीपुरवठा मर्यादित असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र टाकी, तसेच वापराच्या पाण्यासाठी बोअरवेलच्या पाण्याची टाकी अशी व्यवस्था केली होती.
मात्र, महापालिकेने समान पाणी योजनेअंतर्गत नवीन पाण्याच्या टाक्या, तसेच जलवाहिन्या टाकण्यास आणि नियमित पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाल्यानंतर परिस्थिती बदलली. अनेक सोसायट्या, तसेच नागरिकांनी या बोअरवेलचा वापर बंद केला. परिणामी त्या अडगळीत पडल्या. मात्र, आता पाणीटंचाईचे संकट गंभीर झाले असून, महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केल्याने पाण्याच्या टँकरची मागणीही वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी पुन्हा बोअरवेलकडे आपला मोर्चा वळविला आहे.
खर्चाचा वाढीव भुर्दंड
शहरात बोअरवेलची दुरुस्ती, तसेच संबंधित कामे करून देणाऱ्या मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे या कामगारांना जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून बोलावले जात असून, त्यासाठी १० ते १५ हजार रुपयांपर्यंत खर्च करावा लागत आहे. याशिवाय अनेक सोसायट्यांकडे पाण्यासाठी एकच टाकी असल्याने त्यांना महापालिका, तसेच बोअरवेलचे पाणी एकाच टाकीत सोडणे शक्य होत नाही. परिणामी तात्पुरत्या टाक्यांची व्यवस्था करण्यासाठीही त्यांना मोठा अतिरिक्त खर्च उचलावा लागत आहे.





