PUNE: जलसंपदाचा पालिकेवर ‘वॉटर बॉम्ब’; शहरात मोठ्या प्रमाणात पाणीकपात करण्याची सूचना

पुणे – शहराला पाणीपुरवठा करणार्या खडकवासला धरणात कमी पाणीसाठा असल्याने महापालिकेने पाणी बचत करावी, अशी मागणी दोन आठवड्यांपूर्वी केल्यानंतर आता, थेट शहरात मोठया प्रमाणात पाणीकपात करावी, असे पत्रच पाठबंधारे विभागाकडून पुणे महापालिकेस मागील आठवड्यात देण्यात आले आहे. महापालिकेस शुक्रवारी दि.१) हे पत्र मिळाले असले तरी अद्याप प्रशासनाकडून बाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, पालिकेने वेळीच निर्णय घेतला नाही तर उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा समना करावा लागण्याचा धोका आहे.
पाठबंधारे विभागाच्या पत्रात…
पाटबंधारे विभागाच्या अधिक्षक अभियंत्याकडून पाठविण्यात आलेल्या पत्रात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, महापालिकेस, खडकवासला प्रकल्प, भामा़-आसखेड प्रकल्प तसेच पवना नदीतून १४.६१ टीएमसी पाणीसाठा मंजूर आहे. तर पालिका प्रत्यक्षात प्रतीदिन १५६७ एमएलडी पाणी घेत आहे.
हे पाणी पाहता एकट्या महापालिकेस सुमारे २० ते २१ टीएमसी पाणी वापर अपेक्षीत आहे. त्यामुळे, महापालिकेकडून आता पासूनच पाण्याची बचत न केल्यास उन्हाळ्यात पाणीसाठा कमी होउन टंचाईची स्थिती तीव्र होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाटबंधारे विभागाकडून प्रामुख्याने खडकवासला धरणातील पाणी वापर कमी करण्याची मागणी केली जात आहे.
लोकसभेच्या “तोंडावर ‘ कोण घेणार पुढाकार ?
लोकसभा निवडणूका जवळ आल्या आहेत, अशावेळी शहरात पाण्याचा विषय पेटण्याची शक्यता आहे. पुण्यात यापूर्वी अनेकदा निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन पाण्याचे राजकारण झाले आहे. तर पाण्याचा वाद न्यायालया पर्यंत गेला आहे, पालिका प्रशासनाला पाण्याची टंचाई समोर दिसत असली तरी राजकीय वाद ओढावून न घेता पाण्याचे नियोजन करावे लागेल.
शहरातील पाणी वितरण व्यवस्था पाहता महापालिके समोरही पाणीकपाती शिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे निवणुकांच्या तोंडावर पाणी वाचविण्यासाठी कपात करण्याबाबत कोण पुढाकार घेणार हा मोठा प्रश्न आहे.





