पुणे : वारजेत दरोडेखोरांचा पोलिसांवर गोळीबार; कोयता हल्ल्यात पोलीस जखमी, पाच जणांना अटक

पुणे -शहरातील वारजे भागात कोम्बिंग ऑपरेशनवेळी गुन्हे शाखेचे पथक आणि 8 ते 10 दरोडेखोरांमध्ये चकमक उडाली. दरोडेखोरांनी गोळीबाराचा प्रयत्न केला. त्यातील एकाने फेकलेला कोयता लागून पोलीस कर्मचारी प्रकाश कट्टे जखमी झाले. दरोडेखोरांना प्रत्युत्तर देताना पोलिसांनीही सहा राऊंड फायर केले. यातील पाच दरोडेखोरांना पोलिसांनी पकडले. हे दरोडेखोर एका एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. ही घटना वारजे येथील रोजरी स्कूलजवळील म्हाडा वसाहतीत मध्यरात्री घडली.
अमोल अंकुश लामतुरे (27, रा. लातुर, सध्या पुणे स्टेशन), राजू पुनीचंद शिंदे (39, रा. पुणे स्टेशन), सचिन मारुती खैरे (30, रा. वारजे गाव), गणेश मारुती खैरे (32, रा. वारजे गाव), अक्षय उद्धव सोळुंखे (22, रा. वारजेगाव) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
गुन्हे शाखेचे युनिट-3 चे पथक, सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे, पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस उपनिरीक्षक पवार आणि त्यांचे सहकाऱ्यांनी वारजे येथील म्हाडा वसाहतीमध्ये शनिवारी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले.
गुन्हेगारांची झडती घेताना त्यांना रोझरी स्कूलजवळ 8 ते 10 जणांच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस गेले असता, त्यांच्यातील एकाने पिस्तूल काढून पोलिसांच्या दिशेने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनीही गोळीबार केला.
सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी दोन, उपनिरीक्षक राहुल पवार यांनी एक तर एका कॉन्स्टेबलने एसएलआर रायफलमधून तीन राऊंड फायर केले. तेव्हा झालेल्या झटापटीमध्ये एका चोरट्याने पोलिसांच्या दिशेने कोयता फेकून मारला. पकडलेल्या पाच जणांकडून गावठी कट्टा, 4 जिवंत काडतुसे, कोयते, कटावणी, स्क्रू ड्रायव्हर, हातोडा असा माल जप्त केला आहे.





