Pune : 16 वर्षांपासून सेवा रस्त्याची प्रतीक्षाच

आंबेगाव बुद्रुक – मुंबई-बंगळुरू महामार्गाची निर्मिती करताना जांभूळवाडी परिसरात खोल दरी होती. त्यामुळे सन 2002 ते 2005 दरम्यान येथे पूल उभारण्यात आला. यासाठी स्थानिकांच्या जमिनी घेण्यात आल्या. पण, येथील नागरिकांना अजूनही सेवा रस्ता देण्यात आलेला नाही. त्यामुळे महामार्गावर येण्यासाठी नागरिकांना 5 ते 8 किलोमीटरचा वळसा घालावा लागत आहे.
येथे पूल निर्माण करताना महामार्ग विकास प्राधिकरणाने गावासाठी सेवा रस्ता तयार करून देण्याचे मान्य केले होती. पण, आजअखेर या गावांना रस्ताच मिळालेला नाही. महामार्ग रस्ते बांधणी करताना गावांना सेवा रस्ते देणे बंधनकारक आहे. पण, या नियमाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप गावकरी करत आहेत.
कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल रस्ता संवेदनशील असून, चढ-उताराचा भाग आहे. उतारावर वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे या रस्त्यावर सातत्याने अपघात होत आहेत. या रस्त्याच्या विकासासाठी ठेकेदार वारंवार बदलले जात असल्याने रस्त्याचा विकास खोळंबल्याचे चित्र आहे. दरम्यान, यामुळे नागरिकांना मात्र विनाकारण हेलपाटे मारावे लागत असल्याचे चित्र आहे.
महामार्गाचा हा भाग निर्मितीपासूनच विकासापासून वंचित आहे. वेडीवाकडी वळणे, अंधार, जागोजागी खड्ड्यांमुळे या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. काही महिन्यांपूर्वी येथे एका व्यक्तीच्या खुनाची घटना घडली होती, तर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या रस्त्याचा विकास कधी होणार? असा संतप्त सवाल जांभूळवाडी, आंबेगाव, नऱ्हे भागातील नागरिक करत आहेत.
नुसतेच खांब उभारले, दिव्यांचा बेपत्ता
सध्या महामार्गावर विजेचे खांब उभारले असले, तरी अजूनही मीटर बसवण्यात आलेला नाही. त्यामुळे दिवे सुरू करण्यात आले नाहीत. त्यामुळे या कामाला कधी मुहूर्त मिळणार, की आणखी काही नागरिकांना जीव गमावावा लागणार, असा सवाल गावकरी करत आहेत.
महामार्गावर दिव्यांचे खांब उभारूनही वीज जोडली जात नाही. तसेच वाढत्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत प्रशासनाला निवेदन दिले आहे. यावर तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
-नितीन जांभळे
माजी ग्रामपंचायत सदस्य, जांभूळवाडी





