पुणे : स्थायी समिती अध्यक्षपदासाठी आज मतदान

पुणे –महापालिकेच्या अवघ्या 14 दिवसांच्या कालावधीसाठी स्थायी समिती अध्यक्षांची शुक्रवारी निवड करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपकडून विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांना सलग चौथ्यांदा संधी दिली आहे. तर, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रदीप गायकवाड यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, महापालिकेत एकहाती सत्ता असलेल्या स्थायी समितीत सत्ताधारी भाजपचे सर्वाधिक 10 सदस्य असून भाजपचे पूर्ण बहुमत आहे. त्यामुळे, रासने यांची निवड निश्चित असून महापालिकेच्या इतिहासात सलग चौथ्यांदा समिती अध्यक्षपद मिळविणारे रासने हे एकमेव सदस्य ठरणार आहेत.
विद्यमान महापालिकेची मुदत 14 मार्च रोजी संपत असून महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक यावर्षी (2022) मध्ये होणार आहे. सर्वसाधारणपणे महापालिकेची मुदत संपण्यापूर्वी पालिकेच्या निवडणुका जाहीर होतात. त्यामुळे, तीन महिने आधीच आचारसंहिता लागू होत असल्याने नगरसेवकांना तसेच समिती अध्यक्षांना पूर्णवेळ कालावधी मिळत नाही.
मात्र, यावर्षी अद्यापही पालिकेची निवडणूक जाहीर झालेली नसल्याने सदस्यांना पूर्ण कालावधी मिळणार आहे. तर, नियमानुसार 28 फेब्रुवारीला विद्यमान अध्यक्षांची मुदत संपते. तर महापालिका आयुक्तांनीही अद्याप महापालिकेचे अंदाजपत्रक सादर केलेले नाही. त्यामुळे उर्वरीत 14 दिवसांसाठी महापालिकेकडून स्थायी समिती अध्यक्षांची नेमणूक करणे अभिप्रेत होते. त्यानुसार, ही निवडणूक प्रक्रिया होणार असून सकाळी 11 वाजता महापालिकेत ही निवडणूक होणार आहे.





