Pune : माझे कार्यालय, जागरूक कार्यालय अभियानांतर्गत मतदान जनजागृती

पुणे – शासकीय व निमशासकीय तसेच केंद्रीय कार्यालयांमध्ये माझे कार्यालय, जागरूक कार्यालय या अभियानांतर्गत मतदान जनजागृती करत सुमारे एक हजार संकल्पपत्रांचे वाटप करण्यात आले. मतदानाच्या दिवशी विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मतदानाचा अनमोल हक्क बजवावा, असे आवाहन स्वीप व्यवस्थापन कक्षाकडून करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचा सर्व विभाग, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, मध्यवर्ती इमारत, शिक्षण आयुक्त यांचे कार्यालय, संचालक, नगर रचना,सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था, कृषी आयुक्तालय, प्रदूषण नियंत्रण मंडळ यासह अन्य शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन स्वीप व्यवस्थापन कक्षामार्फ़त संकल्पपत्रांचे वाटप करण्यात आले.
शासकीय अधिकारी, कर्मचारी, बँका व खाजगी आस्थापनांच्या सुट्टीचे दिवस लक्षात घेऊन स्वीप व्यवस्थापन कक्षाने पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील गृहनिर्माण सोसायट्यामध्ये जाऊन संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच पदाधिकारी यांना भेटून संकल्पपत्र देण्यात आले. सर्व सोसायट्यांमधील मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेऊन २० नोव्हेंबरला मतदान करून लोकशाही सक्षमीकरणाचा पाया मजबूत करण्याबाबत आवाहन करण्यात आले.





