पुणे – आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये राज्य निवडणूक आयोग व्हीव्हीपॅट मशिन वापरणार नसल्याचे सांगण्यात आले. राज्य निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा विरोधी पक्षांनी निषेध करून मशिन उपलब्ध नसतील, तर बॅलेट पेपरवरच घ्या, अशी मागणी केली आहे. याविषषी माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले, की महानगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया आता जलदगतीने सुरू असताना राज्य निवडणूक आयोगाने एक धक्कादायक निर्णय घेत निवडणुकीतील गैरप्रकारांना एक प्रकारे पोषक वातावरण तयार करण्याची भूमिका घेतली आहे. पुरेसे व्हीव्हीपॅट मशिन्स उपलब्ध नाहीत, असे निव्वळ बोगस कारण देत निवडणूक आयोगाने यंदाच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशिन वापरणार नसल्याचे जाहीर केले आहे. मुळात देशाच्या संसदेने विधानसभा व लोकसभा निवडणूक वगळता इतर कोणत्याही निवडणुकीत ईव्हीएम मशिन वापरण्याचा कायदा केलेला नाही. असे असताना जर निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी पुरेशा प्रमाणात व्हीव्हीपॅट मशिन उपलब्ध नसतील, तर ईव्हीएम मशीनचा घाट कशासाठी, हा प्रश्न उपस्थित केला आहे. निवडणूक प्रक्रियेत व्हीव्हीपॅट नसेल, तर बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी; अन्यथा आम्ही या प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ, अशी भूमिका जगताप यांनी मांडली आहे. आम आदमी पक्षाचे विजय कुंभार यांनी सांगितले, की हा निर्णय अत्यंत आक्षेपार्ह आणि वादग्रस्त आहे. एकीकडे ईव्हीएमच्या वापराबाबत शंका घेतल्या जात आहेत, तर दुसरीकडे बहुसदस्य प्रभागांबाबतही वाद सुरू आहेत. अशा परिस्थितीत व्हीव्हीपॅट न वापरणे म्हणजे पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह उभे करण्यासारखे आहे. जे निकष लोकसभा-विधानसभा निवडणुकांसाठी लावले जातात, तेच स्थानिक स्वराज्य संस्थांनाही लागू व्हायला हवेत. ही फक्त निवडणूक नाही, तर लोकशाहीवरचा विश्वास आहे. तो डळमळू देता कामा नये, अशी अपेक्षा कुंभार यांनी व्यक्त केली.