विजया वसावे ठरल्या महाराष्ट्रातील पहिल्या ट्रान्स वुमन फॉरेस्ट गार्ड

नंदूरबार – येथील सातपुडा रांगेत असणाऱ्या अदिवासी बहूल गावातील विजया वसावे ही महाराष्ट्रातील पहिली ट्रान्स महिला वनरक्षक ठरली आहे. आपल्या लैंगिकतेमुळे सुरुवातीपासूनच विजयाला अनेक अडचणी आणि आव्हानांचा सामना करावा लागला. पण तिने धीर सोडला नाही. अखेर, तिच्या संघर्षाला न्याय मिळाला असून, वनरक्षक म्हणून तिची पोस्टींग झाली आहे.
30 वर्षीय विजयाची लोक चेष्टा करायचे, तिच्याशी अनेकदा गैरवर्तनही करण्यात आले. त्यामुळे तिने तीनदा आत्महत्येचा देखील प्रयत्न केला होता. तथापी कुटुंबाचा पाठिंबा मिळाल्यानंतर विजयाने पुरुषाकडून ट्रान्सजेंडर बनण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून आजपर्यंत तिने मागे वळून पाहिले नाही. राज्याच्या वनविभागात नोकरी मिळवण्यासाठी तिने नुकतीच स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली आहे. विजयाने पुण्यातील कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिसमधून समाजकल्याण विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.





