PUNE : मार्केट यार्डातील चोऱ्या रोखण्यावर ‘वसुली’ उपाय

पुणे – पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक मंडळ आल्यापासून मार्केटयार्डात शेतमालाच्या चोऱ्यांचे वाढलेले प्रमाण थांबायचे नाव घेत नाही. कांदा, लसूण, आले यासह इतर भाव वाढलेल्या शेतमालाच्या चोरीच्या घटना रोजच्या झाल्या आहेत. यापुढे बाजारात शेतमालाच्या चोऱ्या झाल्यास त्याची नुकसान भरपाई ठेकेदारांच्या बिलातून वसुल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती बाजार समितीची सभापती दिलीप काळभोर यांनी दिली.
फळे व भाजीपाला या दोन्ही विभागात शेतमाल चोऱ्यांसह, गाळ्यांवर गांजा, दारू पिणे, कॅमेरा, एसीचे बॉक्स, सीसीटिव्ही कॅमेऱ्यांच्या तोडफोडीच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी गूळ भुसार बाजारात नेहरू रस्त्यावरील दोन दुकाने फोडली होती. त्यापैकी एका दुकानातुन सुमारे 30 हजार रुपयांची तर, भगवती ट्रेडर्स या दुकानातून सुमारे 3 लाखांची चोरी झाली होती. शिवनेरी रस्त्यावरील ज्योती पान शॉप फोडून रोख रक्कमेसह सुमारे 60 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
मात्र, अलीकडे कांदा, लसूण, आले या फळभाज्यांचे भाव वाढल्यानंतर चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. बाजार घटक हैराण झाले असून शेतकरी, आडतदार यांचे आर्थिक नुकसान होत आहे. सध्या, बाजारात दररोज वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडी सोडविण्याची वेळ सचिव तर काही वेळी संचालकांवर येत आहे.
“शेतमालाच्या चोऱ्या वाढल्याच्या पार्श्वभुमीवर बुधवारी (दि.8) आडते असोसिएशनचे अध्यक्ष, पदाधिकारी, आडतदार, ठेकेदार, उपसभापती, सचिव यांची संयुक्त बैठक घेतली. यापुढील काळात शेतमालाच्या चोऱ्या झाल्यास नुकसानीचा खर्च हा संबंधित ठेकेदारांच्या बीलातून वजा करण्याचा निर्णय झाला. शेतकरी, आडत्यांच्या हितासाठी चोऱ्या न थांबल्यास वेळप्रसंगी सुरक्षा रक्षक ठेकेदार बदलला जाईल.” – दिलीप काळभोर, सभापती, बाजार समिती, पुणे





