पुणे : धायरी येथील स्वानंद प्राथमिक शाळेत राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष कै. दादासाहेब मनोरे यांच्या स्मृतिदिनी अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी ‘गीता परिवार’ या संस्थेकडून कमल परदेशी, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. श्रुती मनोरे, शिक्षक प्रतिनिधी वंदना कदम यांनी प्रतिमापूजन केले. राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना दिलेली शिकवण आणि त्यातून उभे राहिलेले स्वराज्य, स्वामी विवेकानंद यांनी शक्तिशाली राष्ट्र उभारणीसाठी दिलेले योगदान आणि आपल्याला केलेले मार्गदर्शन याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात कमल परदेशी यांनी स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील एक प्रसंग सांगितला. त्या अनुषंगाने प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आला. विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमात कमल परदेशी यांच्यासोबत त्यांच्या सहकारी स्मिता कुलकर्णी व अर्चना मिनिया यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वानंद प्राथमिक शाळेचे संस्थापक दादासाहेब मनोरे यांचे कार्य, त्यांनी कष्टातून उभी केलेली ही शाळा आणि त्यांचे योगदान याविषयी कार्यक्रमात स्मरण करण्यात आले.