वरंधा घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी राहणार बंद

पुणे : पुण्यातून कोकणात जाणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. वरंधा घाट आजपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. भोरमार्गे महाडला जाणाऱ्या वरंध घाट मार्गावरील सर्व वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली आहे. पावसाळ्यातील संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी आणि त्या अनुषंगाने आवश्यक उपाय योजना करण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
किती तारखेपर्यंत असणार बंद?
वरंधा घाट 26 जून ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत बंद राहणार आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी याचे आदेश दिले आहेत. या घाटातील पुणे जिल्ह्याच्या हद्दीतील रस्ता हा नागमोडी वळणाचा असून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन अनेकवेळा अचानक दरडी कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे या घटना घडत असतात. त्यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोकणात जाण्यासाठी ‘या’ पर्यायी मार्गांचा करा वापर
पुण्यावरुन कोकणात जाण्यासाठी वरंध घाट हा शार्टकट मार्ग आहे. मात्र आता हा मार्ग बंद करण्यात आले वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. वाहनधारकांनी पुण्याकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-माणगाव-निजामपूर रोड-ताम्हाणी घाट-मुळशी पिरंगुट पुणे आणि पोलादपूर आंबेनळी घाट वाई मार्गे पुणे असा मार्ग वापरावा. तसेच कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर-खेड-चिपळुण-पाटण-कराड- कोल्हापूर” असा मार्ग वापरावा.





