पुणे – टाइम्स हायर एज्युकेशनच्या आशिया क्रमवारीमध्ये पहिल्या दोनशे उच्च शिक्षण संस्थांमध्ये राज्यातील केवळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा समावेश आहे. गेल्या वर्षी 200 ते 251 या गटात असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कामगिरीत सुधारणा करून यंदा या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. त्याचप्रमाणे जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 601 ते 800 च्या दरम्यान आले आहे. गतवर्षी हे स्थान 801 ते 1000 च्या दरम्यान होते.
टाइम्स हायर एज्युकेशनची जागतिक आणि आशिया क्रमवारी 2023 नुकतीच जाहीर करण्यात आली. अध्यापन, संशोधन, सायटेशन्स, आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन असे एकूण 13 निकष विचारात घेऊन उच्च शिक्षण संस्थांचे क्रमवारीसाठी मूल्यमापन करण्यात येते. त्यानुसार आशिया क्रमवारीत देशातील एक संस्था पहिल्या पन्नासमध्ये, चार संस्था पहिल्या शंभर संस्थांमध्ये आणि 18 संस्थांचा पहिल्या दोनशे संस्थांमध्ये समावेश आहे. बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने 48वे स्थान पटकावले आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत या संस्थेची सहा स्थानांनी घसरण झाली आहे.
पुणे विद्यापीठाने 190 वे स्थान मिळविले आहे. 201-250 या गटात पुण्याचे सिंबायोसिस विद्यापीठ, मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, 351 ते 400 या गटात भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर पुणे), 401 ते 500 या गटात मुंबई विद्यापीठाचा समावेश आहे, असे या क्रमवारीतून स्पष्ट झाले आहे.
क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने झेप घेतली आहे, ही बाब अभिमानास्पद आहे. सातत्यपूर्ण गुणवत्ता वाढीसाठी विद्यापीठ कटिबद्ध आहे. त्या प्रकारचे प्रयत्न आणि उपाययोजना करण्यात येत आहे, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे राज्य सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे म्हणाले.