Pune : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त आणि दुरस्थ अध्ययन प्रशालेच्या परीक्षा २६ आणि २७ जुलै रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून, सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी २६ जुलै रोजी सुटी जाहीर करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे मुक्त आणि दूरस्थ प्रशाळेच्या अभ्यासक्रमांच्या २६ आणि २७ जुलै रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. उर्वरित परीक्षा या नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहेत.
सर्व संलग्नित परीक्षा केंद्राचे मा. प्राचार्य, समन्वयक आणि महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी यांनी या बाबतची माहिती संबंधित विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी. तसेच अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या प्रतिनिधींनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाशी संपर्क साधावा, असेही डॉ. काकडे यांनी सांगितले.





