पुणे : पालिकेकडून शहरात अघोषित पाणी कपात

पुणे –शहरात उन्हाचा चटका वाढत असल्याने पाण्याची मागणी वाढत आहे. मात्र, महापालिकेकडून ऐन उन्हाळ्यात पुणेकरांवर अघोषित पाणीकपात लादण्यात आली असून मध्यवर्ती पेठांसह उपनगरांमधील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याच्या तक्रारींची संख्या महापालिकेकडे वाढली आहे. मात्र, मार्च अखेरीचे कारण देत पाणीपुरवठा विभागाकडून नागरिकांची बोळवण केली जात आहे. तर, प्रत्येक गुरुवारी पालिकेकडून शहराच्या कोणत्या ना कोणत्या भागात पाणीबंद ठेवले जात आहे. त्यामुळे शहराच्या अनेक भागांत पुणेकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र आहे.
शहराची लोकसंख्या 40 ते 45 लाख असून शासनाकडून महापालिकेसाठी वर्षाला साडेअकरा टीएमसी पाणी कोटा मंजूर केला आहे. मात्र, प्रत्यक्षात महापालिकेकडून 15 ते 16 टीएमसी पाणी वापरले जाते. त्यामुळे, महापालिकेकडून जादा पाणी वापरले जात असल्याचे सांगत जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाकडे महापालिकेच्या जादा पाणी वापराचा दावा सुरू आहे. या दाव्याच्या सुनावणीत प्राधिकरणाने महापालिकेने पाणी वापर नियंत्रित ठेवावा, दरवर्षी पाण्याचे अंदाजपत्रक करावे, पाण्याचे ऑडिट सादर करावे अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे, महापालिकेची कोंडी झाली होती. त्यातच, महापालिकेच्या निवडणुका असल्याने पालिका प्रशासनावर राजकीय दबाव होता. त्यामुळे महापालिकेत प्रशासक सुरू होताच गेल्या दोन आठवड्यांपासून पालिकेने शहरात अघोषीत कपात केली असून प्रामुख्याने शहराच्या मध्यवर्ती पेठांमधील पाणीपुरवठा कमी करण्यात आला आहे. त्यामुळे, नागरिकांकडून पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारी करण्यात येत आहेत.
उपनगरांचा पाणीपुरवठा विस्कळीत
महापालिकेकडून पाणी वापर कमी करण्यासाठी प्रत्येक गुरुवारी शहराच्या कोणत्या ना कोणत्या भागात पाणीबंद ठेवले जात आहे. मात्र, हे पाणी बंद ठेवल्यानंतर अनेक भागांत जलवाहिन्या रिकाम्या झाल्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी अतिशय कमी दाबाने पाणी येत आहे. त्यामुळे एक दिवस पाणी बंद असल्यास पुढे तीन दिवस नागरिकांना कमी पाणी येत आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना वनवन करावी लागत असून उन्हाचा चटका वाढल्याने पाण्याची दैनंदिन मागणी 10 ते 15 टक्के वाढली आहे.





