PUNE : केशवनगर येथे उफराटा कारभार; महापालिकेने पदपथांवरच पाइपलाइन टाकून केले बांधकाम

मुंढवा – केशवनगर येथील ओढ्यावर असलेल्या नवीन पुलावरुन 18 इंची पिण्याची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. परंतु, यासाठी पदपथावरच ठेकेदाराने बांधकाम केल्याने पादचाऱ्यांनी चालायचे कोठून असा प्रश्न निर्माण झाला आहे, असे उफराटे काम करणाऱ्या अभियंत्यावर, ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
केशवनगर येथील ओढ्यावर जुना व नविन पूल शेजारी शेजारी आहेत. नविन पुलावरुन ये-जा करण्यासाठी एकच पदपथ आहे. नवा पूल अरुंद असल्याने येथून ये-जा करताना नागरिकांना कसरत करावी लागते, याच पुलावर रिक्षा थांबतात, आजूबाजुला अतिक्रमण झाले आहे. आता, याच पुलावर असलेल्या पदपथांवरून लष्कर पाणी पुरवठा ठेकेदाराने जलवाहिनी टाकल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना पुणे शहर जिल्हा युवक अध्यक्ष अनिल भांडवलकर म्हणाले की, जलवाहिनी टाकणे गरजेचेच आहे. परंतु, नागरिकांची गैरसोय करून नवे काम चुकीच्या पद्धतीने करणे योग्य नाही. अशा प्रकारे कामाची परवानगी दिलीच कशी? दोन्ही पुलाच्या मधून किंवा इतर मार्गाने जलवाहिनी टाकता आली असती. पादचाऱ्यांना आता भररस्त्यावरून चालावे लागणार आहे, काही दिवसांपूर्वी पादचारी महिलेचा अपघाती मृत्यू झाला आहे.
त्यामुळे आगामी काळात अशी घटना घडली तर याची जाबाबदारी लष्कर पाणी पुरवठा विभाग अधिकारी सुभाष पावरा, पाणी पुरवठा अधिक्षक अनिरुद्ध पावसकर, आयुक्त विक्रम कुमार घेणार आहेत का? त्यामुळे जलवाहिनीच्या चुकीच्या कामात दुरूस्ती करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
रस्त्याची लागलीय “वाट’…?
केशवनगर-मुंढवा चौकाला जोडणाऱ्या जुना आणि नव्या पुलावरील रस्त्याचीही मोठी दुरवस्था झाली आहे. जुना पुलावरील रस्त्याकडेला अधर्वटच कॉंक्रिटकरण करण्यात आले आहे, याच्या कडा निसरट्या असल्याने यावरून वाहने घसरत आहेत. या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी सातत्याने होत असताना याकडेही महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
पदपथ नक्की कोणासाठी ?
ओढ्याच्या पुलावरील पदपथावरून महवितरणच्या उच्च दाबाच्या काही वाहिन्याही नेलेल्या आहेत. या पदपथावर कचराही टाकला जातो. याच पदपथापुढे विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. पुलाचा वापर फ्लेक्स लावण्यासाठी होतो. अनेक कारणांमुळे येथे नागरिकांची गैरसोय होत असते. त्यामुळे ओढ्यावरील पदपथ नक्की कोणासाठी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.




