Pune : मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला विभागात दुचाकींना प्रवेश

पुणे – मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला, कांदा-बटाटा विभागात अखेर दुचाकींना प्रवेश करण्यास बाजार समिती प्रशासनाच्या वतीने मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह आडतदारांना दिलासा मिळाला आहे. दुपारी १ ते २ या वेळेत बाजारात दुचाकी नेता येणार आहे.
दोन महिन्यांपूर्वी सकाळी ११ ते १२ या वेळेत दुचाकींना प्रवेश देण्यात येत होता. मात्र, बाजार समितीने आदेश काढून दुचाकींचा प्रवेश पूर्णपणे बंद केला होता. आंब्याचा हंगाम असल्याने दुचाकी चालविण्यास मुभा द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात येत होती.
दुचाकीला प्रवेश नसल्याचा परिणाम व्यापारावर होत आहे. १० ते २० टक्के व्यापार कमी होत आहे. त्यामुळे बाजारात दुचाकींना प्रवेश देण्याची मागणी करण्यात येत होती. या मागणीला यश आले आहे. आता दुचाकीला प्रवेश मिळणार आहे.
फळ, भाजीपाला विभागात दुचाकी सुरू करण्याची मागणी सातत्याने होत होती. आडतदार अमोल घुले, विलास भुजबळ व व्यापारी संचालक गणेश घुले यांनी केलेल्या मागणीनुसार बाजारात दुचाकीस प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. – दिलीप काळभोर, सभापती, पुणे बाजार समिती.
व्यापार वाढीसाठी व बॅंकिग कामासाठी फळ, भाजीपाला विभागात दुचाकींना प्रवेश देण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी ६७ आडत्यांनी सही केलेले निवेदन सभापती दिलीप काळभोर यांना दिले होते. यावर सकारात्मक निर्णय घेतल्याने सभापतींचे आभारी मानतो.- अमोल घुले, माजी उपाध्यक्ष, आडते असोसिएशन





