Pune : गंभीर गुन्ह्यातील आरोपींना आश्रय देणारे दोघे अटक

पुणे – लष्कर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयातील आरोपींना आश्रय दिल्याप्रकरणी खंडणी विरोध पथक दोन आणि लष्कर पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे. या दोघांनी आरोपींना आश्रय देण्याबरोबरच पलायणासाठी मदतही केली होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दिनांक 20 जून 2023 रोजी लष्कर पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.
हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार ऍलेक्स गवळी व त्याचे दहा ते पंधरा साथीदार यांनी केला आहे. गुन्हा केल्यापासून ऍलेक्स गवळी व इतर आरोपी हे फरारी आहेत. फरारी आरोपीतांचा शोध गुन्हे शाखा व लष्कर पोलीस ठाणश्याचे पथक संयुक्तरित्या घेत होते. तेव्हा त्यांना शुभम प्रितम सारवान ( रा. धोबीघाट, शंकरशेठ रोड, कॅम्प ) आणि अजिम सलीम शेख ( रा. कासेवाडी ) यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता शुभम प्रितम सारवान व अजिम सलीम शेख यांनी ऍलेक्स गवळी व इतर आरोपींनी गंभीर अपराध केला असतानाही त्यांना माहित असताना देखील त्यांना आश्रय देवून पलायन करण्यासाठी व लपून मदत केल्याचे निष्पन्न झाले. त्यानूसार दोघांना अटक करण्यात आली. भविष्यात अशाच प्रकारे सराईत गुन्हेगारांना आश्रय देणारे इसमांवर गुन्हे शाखे मार्फत कडक कारवाई करण्यात येणार आहे.
ही कामगिरी सहायक आयुक्त सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, शशिकांत चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे,मोहनदास जाधव उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण व पोलीस अंमलदार विजय गुरव, प्रदिप शितोळे, संग्राम शिनगारे, सुरेंद्र जगदाळे, सैदोबा भोजराव, सचिन अहिवळे, अमोल पिलाने, चेतन आपटे, अनिल मेंगडे, इश्वर आघंळे, राहुल उत्तरकर, शंकर संपते, पवन भोसले, चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे, किशोर बर्गे व लष्कर पोलीस स्टेशन यांनी संयुक्तरित्या केलेली आहे.
लष्कर भागात दोन टोळ्यांत वैमनस्य
लष्कर परिसरात दोन टोळ्यांमध्ये वैमनस्य आहे. यातील ऍलेक्स गवळी टोळीने समोरील टोळीतील दोघा तीघांवर जीवघेणा हल्ला केला होता. यानंतर टोळीतील दोघांना अटक करण्यात आली आहे. तर मुख्य आरोपी ऍलेक्स आणि त्याचे इतर साथीदार फरार आहेत. त्यांना पळून जाण्यासाठी दुचकी देऊन शुभम आणि अजिम यांनी मदत केली. तसेच त्यांच्या रहाण्याची सोयही केली. दोघेही आरोपी सराईत गुन्हेगार असून शुभवर एक खूनाचा गुन्हाही दाखल आहे. खूनाच्या प्रयत्नानंतर लष्कर भागातील दोन्ही टोळ्यांत धुसफुस सुरु आहे.





