पुणे तुंबले! सर्वच मुख्य रस्त्यांवर पाण्याचे पाट; साचलेल्या पाण्यामुळे वाहने ठप्प

पुणे – शहर- उपनगरांत शनिवारी अवघ्या दीड-दोन तासांत सुमारे १०० मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाला. या रौद्ररुपी पावसाने संपूर्ण शहर अक्षरश: पाण्याखाली गेले. जवळपास सर्वच मुख्य अरुंद रस्त्यांवर तीन ते चार फूट पाणी साचले. हे पाणी लोकवस्तीत शिरले. त्यामुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांची धांदल उडाली. या साचलेल्या पाण्यात अनेकांची वाहने बंद पडल्याने नागरिकांना मोठी आर्थिक झळ सहन करावी लागली आहे. विशेषत: शहराच्या पूर्व आणि दक्षिणेकडील उपनगरांत पावसाने थैमान पाहायला मिळाले.
शनिवारी शासकीय सुट्टी असल्याने नेहमीप्रमाणे आपत्कालीन यंत्रणा सुट्टीवर होती. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी पुणेकरांना तीन ते चार तास वाट पाहावी लागली. या पावसाचा सर्वाधिक फटका सिंहगड रस्ता, कर्वेनगर, कोथरूड, धायरी, भवानीपेठ, गोखलेनगर, लोहगाव, धानोरी, परांडेनगर, विश्रांतवाडी, टिंगरेनगर, येरवडा, औंध, शिवाजीनगर, कात्रज, बिबवेवाडी, बावधन, सुतारदरा मध्यवर्ती पेठांना बसला.
अनेक घरांमध्ये आणि दुकानात पाणी घुसले आहे. तर पाऊस थांंबल्यानंतर शहरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. आधी पावसाने वाहत असलेले नंतर वाहनांच्या गर्दीने ओसंडून वाहत होते. त्यामुळे आधीच पावसाने मनस्ताप सहन कराव्या लागलेल्या पुणेकरांना नंतर वाहतूक कोंडीचाही फटका सहन करावा लागला.
शहरातील मेट्रो मार्गांवरही पावसाचे पाणी साचले होते. सिंहगड रस्ता येथे उड्डाणपुलाच्या कामामुळे ठिकठिकाणी पाणी साचले. विशेषत: ब्रह्मा गार्डन आणि माणिकबाग परिसरात ४० ते ५० घरे आणि दुकानांमधे पावसाचे पाणी शिरले. कर्वेनगर परिसरातील गणेशनगर आणि कोथरूडमधील सुतारदरा परिसरातही अनेक घरांमध्ये पाणी शिरले. वडगाव बुद्रूक येथील पुलाखालील बाजूस पाणी साचल्याने वाहने अडकून पडली होती.
यासोबतच कर्वे रस्त्यावर सोनल हाॅलपासून डेक्कनपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंस तीन ते चार फूट, कोथरूड कचरा डेपो परिसरांसह औंध येथील सिंध सोसायटी परिसरात मेट्रोच्या कामामुळे अधिक पाणी साचले होते. या पाण्यात वाहने तसेच रिक्षा अडकल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवावी लागली.
अशीच स्थिती गणेखखिंड रस्ता, पुणे स्टेशन, वाडिया महाविद्यालय ते बंडगार्डन, कल्याणीनगर, गुंजन चौकातही मेट्रो स्थानकांच्या खाली पाण्याची तळी साचली होती. आळंदी रस्त्यावरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी येथे बीआरटी बसस्टाॅप येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले. तेथे पावसाळी लाइन नसल्याने पाण्याचा निचरा झाला नाही. त्याचा फटका लगतच्या रहिवाशांना बसला.
पाच कोटींचा खर्च करून डेक्कन पुन्हा पाण्यात
दोन वर्षांपूर्वी डेक्कन आणि जंगली महाराज रस्ता परिसरात पावसाचे पाणी शिरले होते. त्यावर महापालिकेवर मोठी टीका झाली. महामेट्रो प्रशासनाने तेथे पावसाळी वाहिनीतच खांब उभारल्याने ती स्थिती उद्भवली होती. त्यानंतर पालिकेने ही पूरस्थिती रोखण्यासाठी जवळपास साडेपाच कोटींचा खर्च करत एक थेंबही पाणी साचणार नाही, असा दावा केला होता. मात्र, शनिवारी पालिकेचा दावा आणि पावसाळी वाहिनीसाठी केलेला साडेपाच कोटींचा खर्च पाण्यात गेला आहे.





