Pune : पशुवैद्यकीय विभागातील बदल्या समुपदेशाने

पुणे : राज्याच्या सर्व भागांमध्ये पशुवैद्यकीय सेवांचा योग्य समतोल, तसेच बदल्यांची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व न्याय्य पद्धतीने पार पाडावी, या उद्देशाने पशुसंवर्धन विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी पशुधन विकास अधिकारी (गट-अ) व सहायक आयुक्त पशुसंवर्धन (गट-अ) या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या समुपदेशनाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे केवळ बदल्यांची प्रक्रिया पारदर्शक होणार नाही, तर विभागात कार्यरत अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तृत्व व कार्यक्षमता यानुसार योग्य ठिकाणी नियुक्ती मिळण्यास मदत होणार आहे. तसेच, राज्याच्या विविध भागांमध्ये पशुसंवर्धनाच्या कामकाजात गुणवत्ता वाढवण्यास यामुळे हातभार लागणार आहे.
समुपदेशनाद्वारे बदल्यांची ही प्रक्रिया १५ व १६ मे २०२५ रोजी पुणे येथील आयुक्त, पशुसंवर्धन कार्यालयात पार पडणार आहे. यामध्ये सुमारे ६५० अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रक्रियेमध्ये संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य असून, त्यांना उपलब्ध पदविकल्पांपैकी त्यांच्या पसंतीनुसार पर्याय निवडण्याची संधी दिली जाणार आहे.





