Pune traffic : पुणेकरांचा वीकेंड ‘जाम’! दिवाळी खरेदीसाठी लक्ष्मी रस्त्यावर गर्दीचा स्फोट, वाहनांच्या लांबच लांब रांगा.

प्रभात वृत्तसेवा
पुणे – दारात आलेली दिवाळी आणि नुकताच हाती पडलेला पगार हा योग साधत हजारो पुणेकरांनी खरेदीसाठी लक्ष्मी रस्त्यावर धाव घेतली. त्यातच शनिवार असल्याने सकाळपासूनच रस्त्यावर वाहनांची आणि नागरिकांची प्रचंड गर्दी झाल्याने लक्ष्मी रस्ता, रविवार पेठ, विश्रामबाग वाडा, बाजीराव रस्ता, अलका चौक, नारायण पेठ आदी परिसर वाहतूक कोंडीत अक्षरशः ठप्प झाला. विशेष म्हणजे शुक्रवारी बॉम्ब ब्लास्टच्या मॉक ड्रीलने मध्यवर्ती भागाने कोंडीचा अनुभव घेतला. सलग दुसऱ्या दिवशी जीवघेण्या वाहतूक कोंडीने पुणे हैराण झाले.
कुटुंबासह खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची संख्या इतकी वाढली की, चारचाकी वाहनांच्या ओघाने परिस्थिती आणखी बिकट झाली. ऐरवीही मध्यवर्ती भागात दुचाकीसाठी पार्किंग मिळणे कठीण असते, मात्र शनिवारी हजारो वाहनांमुळे महापालिकेचे वाहनतळ पूर्ण भरले. दुकानांनी केलेली व्हॅलेट पार्किंगची सोयही अपुरी ठरली. परिणामी अनेकांनी रस्त्याच्या कडेला, अगदी नदीपात्रातसुद्धा वाहने उभी केली, ज्यामुळे कोंडीत आणखी भर पडली.एकेरी रस्त्यांवर उलट दिशेने वाहनं दामटल्याने वादावादी, आरडाओरडा सुरू झाला.
खरेदीच्या उत्साहाला वाहतुकीच्या त्रासाने चांगलाच ब्रेक बसला. दरम्यान, दिवसभर दुकानदारांकडे माल आणण्यासाठी येणाऱ्या छोट्या-मोठ्या वाहनांनीही रस्ते अडवले. त्यामुळे वाहतूक पोलिस गर्दीचे व्यवस्थापन करण्याचा ताण वाढला आहे.आगामी काही दिवसांत दिवाळीची खरेदीसाठी आणखी गर्दी वाढणार असल्याने महापालिकेने तातडीने पर्यायी पार्किंगची सोय करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच गर्दीच्या तुलनेत सार्वजनिक शौचालयांची अपुरी संख्या हीसुद्धा मोठी समस्या ठरत असून अनेकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. याबरोबर पदपथावर असेलेल्या पथारीवाल्यांमुळे चालणेही मुश्किल झाले असून अतिक्रमणही हटवण्याची मागणी करण्यात आली.
शिवसेनेचे नेते उध्दव ठाकरे यांचा नवी पेठेत वार्तालाप होता. यामुळे त्यांच्या कॅनव्हायसाठी काही काळ वाहतूक रोखून धरण्यात आली होती. याचाही परिणाम टिळक रस्ता आणि लक्ष्मी रस्ता आदी मध्यवर्ती रस्त्यावर दिसून आला.





