Pune: अंगारकी चतुर्थीनिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल; मध्यवर्ती भागात विशेष नियोजन

पुणे : अंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन, पुणे शहर वाहतूक पोलीसांनी मंगळवार, दि. १२ ऑगस्ट रोजी मध्यवर्ती भागातील वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलांमुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.
पुणे शहराचे पोलीस उपआयुक्त (वाहतूक) हिंमत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ७ वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत पीएमपीएमएल बसेस, चारचाकी आणि जड वाहनांसाठी काही मार्गांवर वाहतूक नियोजन लागू राहील. मात्र, अग्निशमन वाहने, रुग्णवाहिका यांसारख्या अत्यावश्यक सेवांना या बदलांमधून सूट देण्यात येईल.
वाहतुकीतील प्रमुख बदल खालीलप्रमाणे:
पुरम चौक ते शिवाजीनगर: बाजीराव रोडवरील वाहने पुरम चौकातून टिळक रोड, अलका टॉकीज चौक आणि एफ.सी. रोडमार्गे इच्छित स्थळी पोहोचतील.
शिवाजी रोड ते स्वारगेट: स.गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोड, खंडोजीबाबा चौक, टिळक चौक आणि टिळक रोडमार्गे वाहतूक वळवण्यात येईल.
अप्पा बळवंत चौक: बुधवार चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करून ती बाजीराव रोडमार्गे सरळ सोडली जाईल.
वाहतूक पोलीसांनी नागरिकांना गर्दी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.





