PUNE: दहीहंडीमुळे मध्य भागातील वाहतुकीत आज बदल; ‘या’ पर्यायी मार्गाचा करावा लागणार वापर

पुणे – गोकुळअष्टमीच्या सणानिमित्त शहर व लगतच्या परिसरात गुरुवारी (दि. 7) दहीहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा केला जाणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. त्याचबरोबर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहन व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.
यानिमित्ताने विशेषतः शहरातील मध्यभागातील शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, टिळक रोड येथे दहिहंडी पाहण्यासाठी गर्दी होते. विशेषत: बुधवार चौक ते दत्तमंदिर चौक तसेच बेलबाग चौक ते सेवासदन चौक, बुधवार चौक ते अप्पा बळवंत चौक, मंडई चौक ते बाबू गेनू चौक, साहित्य परिषद चौक नवी या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये, वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे. सायंकाळी 5 ते दहीहंडी फुटेपर्यंत हा बदल असणार आहे.
1) शिवाजी रोडवरून स्वारगेटला जाण्यासाठी : स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने खंडोजी बाबा चौक, टिळक चौक-पुढे टिळक रोडने, शास्त्री रोडने इच्छित स्थळी जावे. 2) पुरम चौकातून बाजीराव रोडवरून शिवाजीनगरकडे जाण्यासाठी पुरम चौकातून टिळक रोडने-अलका टॉकीज चौक व पुढे एफ.सी. रोडने इच्छित स्थळी जावे. तसेच पुरम चौकातून सेनादत्त चौकाकडे व पुढे इच्छित स्थळी जाता येईल.
3) स. गो. बर्वे चौकातून पुणे मनपा भवनकडे जाण्यासाठी : जंगली महाराज रोडने-झाशी राणी चौक डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे.
4) बुधवार चौकाकडून आप्पा बळवंत चौकाकडे एकेरी वाहतूक असणार आहे. बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक बाजीराव रोडने सरळ पुढे इच्छितस्थळी जाऊ शकेल. 5) रामेश्वर चौक ते शनिपार चौकाकडे येणारी वाहतूक बंद करण्यात आली.
6) सोन्या मारुती चौकाकडून लक्ष्मी रोडने सरळ सेवासदन चौकाकडे वाहतुकीसाठी बंद केला आहे. वाहने सोन्या मारुती चौकातून उजवीकडे वळून फडके हौद चौकातून इच्छित स्थळी जाऊ शकतील. 7) शिवाजी रोडवरून जिजामाता चौकातून गणेश रोडने दारुवाला पुलाकडे जाणारी वाहतूक ही गाडगीळ पुतळा येथून डाव्या बाजूने कुंभारवेस चौक- पवळे चौक-जुनी साततोटी पोलीस चौकीमार्गे इच्छितस्थळी जाऊ शकेल. 8) गणेश रोडवरील संपूर्ण वाहतूक ही दारुवाला पूल येथून बंद राहील. तसेच देवजीबाबा चौक व फडके हौद चौकात वाहतूक बंद करण्यात येईल. अपोलो टॉकिज, नरपतगिरी चौक, दारुवाला पूल आणि दुधभट्टी या मार्गाचा वापर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
“दहीहंडीच्या उत्सवासाठी मध्य भागात मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. मंडई भागात पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. ध्वनिवर्धकाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या नियमांचे पालन मंडळांनी करावे, अशा सूचना दिल्या आहेत. रात्री दहा वाजेपर्यंत ध्वनीवर्धकास परवानगी आहे. संभाव्य घातपाती कारवाया, तसेच दागिने, मोबाइल चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.” – संदीपसिंग गिल, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक





