Pune : पर्यटन बसला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) सुरू केलेल्या पर्यटन बससेवेला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषत: रांजणगाव, छत्रपती संभाजी महाराज समाधी, इस्काॅन मंदिर, भंडारा डोंगर, देहू गाव, प्रति शिर्डी आणि हाडशी येथील पर्यटनाला पर्यटकांकडून अधिक पसंती आहे. त्यामुळे रविवारी (दि. ८) या तीनही पर्यटन मार्गावर बस धावल्या.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते या पर्यटन बसला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी पीएमपीचे चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर सतीश गव्हाणे, प्रभारी कामगार व जनता संपर्क अधिकारी किशोर चौहान, पास विभाग प्रमुख विकास मते, डेपो मॅनेजर शैलेश जगताप, राजेश जाधव, विजयकुमार मदगे, न.ता.वाडी, राजकुमार माने, सचिन वाबळे यांची उपस्थिती होती.
पीएमपीच्या डेक्कन बसस्थानक येथून पर्यटन बससेवा क्र. ६ साठी १ बस तसेच पर्यटन बससेवा क्र. ८ व ९ साठी प्रत्येकी २ बसेस अशा एकूण ५ बसेस मार्गस्थ झाल्या. त्यामध्ये एकूण १५१ पर्यटकांनी बुकिंग केले. त्यामध्ये महिला पर्यटकांची संख्या अधिक होती. दरम्यान, पर्यटन बससेवेसाठी डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर गाडीतळ, भोसरी बसस्थानक, निगडी, मनपा भवन या पास केंद्रांवरून बुकिंग करता येईल.
अशी आहे पर्यटन बससेवा
पर्यटन बस क्रमांक ६ : पुणे स्टेशन, वाघेश्वर मंदिर (वाघोली), वाडेबोल्हाई, छत्रपती संभाजी महाराज समाधी मंदिर (वढू बुद्रुक), रांजणगाव गणपती, पुणे स्टेशन.
पर्यटन बस क्रमांक ८ : पुणे स्टेशन, स्वारगेट, इस्कॉन मंदिर (रावेत), मोरया गोसावी मंदिर (चिंचवड), शिरगाव प्रतिशिर्डी, देहूगाव गाथा मंदिर, भंडारा डोंगर पायथा, पुणे स्टेशन
पर्यटन बससेवा क्रमांक ९ : स्वारगेट, पौडगाव, श्री सत्य साईबाबा महाराज आश्रम हाडशी, चिन्मय विभूतीयोग साधना ध्यानकेंद्र कोळवण, स्वारगेट
पीएमपी पर्यटन बससेवेला महिला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पर्यावरणपूरक व वातानुकूलित ई-बसेसद्वारे विशेष ‘पर्यटन बससेवा’ सुरू आहे. तरी या बससेवेचा लाभ जास्तीत जास्त पर्यटकांनी घ्यावा
दीपा मुधोळ-मुंडे, अध्यक्ष पीएमपीएमएल, पुणे
– प्रति प्रवासी तिकीटदर ५०० रुपये
– एकूण १० पर्यटन बस मार्ग (शहराजवळील)
– ३३ प्रवाशांचे ग्रुप तिकीट काढल्यास ५ प्रवाशांचे बुकिंग मोफत
– प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार व सार्वजनिक सुटीच्या दिवशी पर्यटन बससेवा
– आवश्यक तेवढे बुकिंग झाल्यास आठवड्याचे सातही दिवस बससेवा उपलब्ध
– अल्पप्रतिसाद असल्यास रद्द झालेली बससेवा इतर दिवशी करण्याची मुभा
– त्याच तिकिटावर राहत्या घरापर्यंत प्रवास करता येणार





