Pune: टोमॅटो दर लालबुंद; किरकोळ बाजारात ६० रुपये किलो

पुणे – बदलत्या हवामानाचा फटका बसल्याने टोमॅटो उत्पादन घटले आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे टोमॅटोचे भाव कडाडले आहेत. एरवी घाऊक बाजारात १० ते २० रुपये किलो भावाने विक्री होणाऱ्या टोमॅटोला आता ५० ते ६० रुपये भाव मिळत आहे. परिणामी, किरकोळ बाजारातही चढ्या भावाने टोमॅटोची विक्री होत आहे. पाव किलोला ३० रुपये मोजावे लागत आहेत. पुढील काही दिवस हिच स्थिती कायम राहिल, असा अंदाज ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी वर्तविला आहे.
दररोजच्या स्वयंपाकामध्ये टोमॅटोचा समावेश असतोच. स्वतंत्र भाजी-चटणी ते वाटणात याचा समावेश असल्याने टोमॅटोला नेहमीच चांगली मागणी असते. परंतु, टोमॅटो महागल्याने किचन बजेट कोलमडत आहे. येथील तरकारी विभागात शुक्रवारी (दि. २१) ५ ते ६ हजार पेटी टोमॅटोची आवक झाली.
ही आवक नेहमीच्या तुलनेत निम्मीच आहे. येथील बाजारात सोलापूर, सातारा, सांगलीसह पुणे जिल्ह्यातून होत आहे. हवामान बदलाचा परिणाम पिकावर झाला आहे. मागील काही दिवसांत टोमॅटोची आवक घटत चालली आहे. त्यामुळे भावात तेजी असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.
“सुरूवातीला पडलेली अति उष्ण्ता, त्यानंतर मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याचा फटका टोमॅटोच्या पिकाला बसला आहे. परिणामी, उत्पादन घटले आहे. त्यामुळे आवक कमी होत असल्याने भावात तेजी आहे.” – विलास भुजबळ, ज्येष्ठ आडतदार, मार्केट यार्ड





