Pune : वारीत टोलमाफीचे पास आरटीओकडून घेणे आवश्यक

पुणे – आषाढी वारीला पंढरपूरला जाणार्या आणि परत येणार्या भाविक आणि वारकर्यांच्या वाहनांना टोलमधून सवलत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या सवलतीसाठी वाहनधारकांनी त्यांच्या वाहनांची सर्व कागदपत्रे जमा करून प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) पुणे येथून अधिकृत पास घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केले आहे.
राज्य सरकारने दि. १६ जूनला याबाबतचा निर्णय घेतला आहे. दि. १८ जून ते १० जुलै या कालावधीत वारीसाठी पंढरपूरला जाणार्या आणि परतणाऱ्या हलक्या आणि जड वाहनांना टोलमाफी दिली जाणार आहे.
या योजनेअंतर्गत वाहनधारकांनी आरटीओच्या खटला विभागात नोंदणी प्रमाणपत्र, विमा, प्रदूषण प्रमाणपत्र, कर भरलेले असणे, परवाना आणि फिटनेस प्रमाणपत्र आदी कागदपत्रांसह अर्ज सादर करावा लागेल. त्यानंतर तत्काळ त्यांना प्रवासासाठी आवश्यक स्टिकर/पास दिला जाईल. आरटीओ कार्यालयात यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी सांगितले.
वारीच्या काळात वाहतुकीचा ताण लक्षात घेता भाविक आणि वारकर्यांना प्रवासात अडथळा येऊ नये, यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी, टोलमाफीसाठी वाहनधारकांनी त्यांच्या वाहनांचे कागदपत्र जमा करून आरटीओ मधून स्टिकर घ्यावेत, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.





