US-Israel-Iran War – इराण आणि अमेरिका यांच्यात दोन आठवड्यांचा युद्धविराम झाल्यानंतर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील आपली पकड अधिक घट्ट केली आहे. जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या या अरुंद जलमार्गातून जहाजांची वाहतूक करण्यासाठी इराण आता शिपिंग कंपन्यांकडून क्रिप्टोकरन्सीमध्ये टोलची मागणी करण्याची शक्यता असल्याचे वृत्त समोर आले आहे. इराणच्या तेल, गॅस, आणि पेट्रोकेमिकल प्रॉडक्ट्स एक्सपोर्टर्सचे प्रवक्ते हमिद हुसैनी यांच्या मते, इराणला सामुद्रधुनीतून जाणा-या प्रत्येक जहाजावर टोल घ्यायचा आहे. तसेच प्रत्येक जहाजाची पडताळणी करायची आहे. या दोन आठवड्यांच्या कालावधीचा वापर शस्त्रास्त्रांच्या ने-आण करण्यासाठी केला जात नाही ना, याची खात्री करण्यासाठी प्रत्येक जहाजावर लक्ष ठेवणे इराणसाठी आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. या रिपोर्टनुसार, प्रति बॅरल १ डॉलर इतक्या टोलची मागणी करण्यात आलेली आहे. तसेच जरी प्रत्येक जहाज सामुद्रधुनी ओलांडू शकत असले तरी, ती ओलांडण्याच्या प्रक्रियेला वेळ लागत आहे. US Iran War: इराणच्या रिव्हॉल्युशनरी गॉर्ड कोर्प्सने म्हटले की, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करू इच्छिणा-या सर्व जहाजांना सूचित केले जाते की, सागरी सुरक्षेच्या तत्वांचे पालन करण्यासाठी आणि समुद्रातील सुरूंगांशी संभाव्य धडक टाळण्यासाठी त्यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांच्या वाहतुकीबाबतचे निर्णय इराणची सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेकडून घेतले जातात. ईमेल पाठवावा लागणार : इराणने पुन्हा होर्मुझची सामुद्रधुनी रोखून धरण्यापूर्वी हुसैनी म्हणाले, सामुद्रधुनीतून जाणा-या प्रत्येक जहाजाला ते घेऊन जात असलेल्या कार्गोची माहिती देणारा एक ईमेल प्रशासनाला पाठवावा लागेल. त्यानंतर इराणकडून त्यांना डिजीटल करन्सीमध्ये किती शुल्क भरावे लागेल हे सांगितले जाईल. तेलाच्या प्रति बॅरलसाठी १ डॉलर इतका टोल आहे. मात्र, रिकामी जहाजे कोणत्याही शुल्काशिवाय सामुद्रधुनी ओलांडू शकतात. तसेच पर्शियन आखातातील तेलाची वाहतूक करणा-या जहाजांना जर इराणची परवानगी घेतली नाही, तर त्यांच्यावर लष्कराकडून हल्ले केले जाऊ शकतात, असा इशारा देण्यात आला आहे.