पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी गुरुवार (दि. ३ एप्रिल) पर्यंत मुदतवाढ दिली आहे. काही कारणास्तव परीक्षा अर्ज भरण्याचे राहून गेलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्याची ही शेवटची संधी आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत परीक्षा अर्ज भरून संबंधित अधिकाऱ्यांनी अर्ज इनवर्ड करायचा आहे. विद्यार्थी ३ एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज भरू शकतात, तर ४ एप्रिलपर्यंत परीक्षा अर्ज कायम (इनवर्ड) करू शकतात. विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांमध्ये संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरता येणार आहेत. त्यात एलएलएम, एमएससी, बीसीए, इंजिनियरिंग, प्रथम वर्ष बीकॉम अशा अभ्यासक्रमांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरून घेण्याची जबाबदारी महाविद्यालयांनी कार्यालयीन काळात गांभीर्याने पार पाडावी, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी स्पष्ट केले आहे.