pune : बालभारती-पौडफाटा रस्त्यासाठी वेळकाढूपणा?

मंजूर आराखड्यानुसारच काम करण्याची मागणी
पुणे – वेताळ टेकडीवरून जाणाऱ्या बालभारत- पौडफाटा रस्त्यावरील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पर्यावरण परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याच वेळी महापालिकेकडून या रस्त्यासाठी मंजूर आराखड्यानुसार इतर प्रक्रिया करणे अपेक्षित असतानाच, यंदाच्या अंदाजपत्रकात निधी नसल्याचे कारण पुढे करत या आराखड्याबरोबरच येथे भुयारी मार्ग करता येऊ शकतो का, याची चाचपणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नव्याने आराखडा केल्यास त्यावरून पुन्हा एकदा महापालिका व पर्यावरणप्रेमींत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
या रस्त्याची लांबी सुमारे १.८ किलोमीटर आणि रुंदी ३० मीटर असून, उन्नत, तसेच जमिनीवरील अशा मिश्र पद्धतीचा आराखडा महापालिकेने यापूर्वी मंजूर केला होता. त्यासाठी २०२२ मध्ये सुमारे २५२ कोटी रुपयांचा डीपीआर तयार केला होता. हा प्रकल्प वेताळ टेकडीच्या पर्यावरणास बाधक असल्याचा दावा करत पर्यावरणप्रेमी नागरिकांनी उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने या कामास पर्यावरण परवानगी मिळेपर्यंत स्थगिती दिली असून, परवानगीसाठी आवश्यक प्रक्रिया आता महापालिका सुरू करणार आहे.
दरम्यान, प्रकल्पाच्या सल्लागाराने दिलेल्या तीन पर्यायांमध्ये जमिनीवरील रस्ता, उन्नत मार्ग आणि बोगदा यांचा समावेश होता. त्यापैकी उन्नत मार्गाचा पर्याय निवडून तो आराखडा मंजूर झालेला असताना बोगदा करण्याच्या शक्यतेची नव्याने तपासणी केल्यास पुन्हा मंजुरी प्रक्रिया, हरकती आणि न्यायालयीन वादाचे चक्र सुरू होण्याची भीती महापालिकेचे अधिकारीच व्यक्त करत आहेत. त्यामुळे महापालिकेने तत्काळ जुन्या आराखड्यानुसार काम सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
पालिकेने सर्व पर्यायांचा विचार करून उन्नत मार्ग मंजूर केला आहे. आता भुयारी मार्गाचा पर्याय उचलल्यास प्रकल्प पुन्हा न्यायालयीन प्रक्रियेत अडकणार आहे. त्यामुळे पर्यावरण परवानगी घेऊन मंजूर आराखड्यानुसारच पुढे जावे, तसेच तत्काळ या रस्त्यासाठीची प्रक्रियाही सुरू करावी.
– उज्ज्वल केसकर, माजी विरोधी पक्षनेते





