Amanora Township : 125 कंपन्या, 300 प्रकल्पांमध्ये ‘अमनोरा’ ठरले अव्वल; पर्यावरणपूरक उपक्रमांची CIIकडून दखल
Amanora Township : पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी अमनोरा टाउनशिपला CIIचा ‘एक्सलंट एन्व्हायर्नमेंट प्रॅक्टिस अवॉर्ड 2026’ पुरस्कार मिळाला. कचरा व्यवस्थापन, जलसंवर्धन आणि अक्षय ऊर्जेच्या उपक्रमांची दखल.

Amanora Township : पर्यावरण संवर्धन, संसाधनांचा योग्य वापर आणि शाश्वत विकासासाठी राबविलेल्या उपक्रमांची दखल घेत अमनोरा टाउनशिपला भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) ‘नॅशनल अवॉर्ड फॉर एन्व्हायर्नमेंटल बेस्ट प्रॅक्टिसेस २०२६’ अंतर्गत ‘एक्सलंट एन्व्हायर्नमेंट प्रॅक्टिस अवॉर्ड २०२६’ पुरस्कार मिळाला आहे. चेन्नई येथे झालेल्या सोहळ्यात अमनोराच्या वतीने अमोल बोराटे आणि अमित सास्ते यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
या पुरस्कारासाठी १२५ हून अधिक कंपन्या आणि ३०० हून अधिक प्रकल्प सहभागी झाले होते. टाटा स्टील, जीएमआर हैदराबाद, टाटा ऑटोकॉम्प आणि किर्लोस्कर यांसारख्या संस्थांचाही सहभाग होता.
अमनोरा येथे कचरा व्यवस्थापन, जलसंवर्धन, अक्षय ऊर्जा आणि हरित क्षेत्र वाढविण्यावर भर दिला जातो. येथे दररोज सुमारे १५ हजार किलो घनकचऱ्याचे व्यवस्थापन केले जाते. कचऱ्याचे वर्गीकरण, प्रक्रिया आणि पुनर्वापर केला जातो. सेंद्रिय कचऱ्यापासून खत तयार करण्यासाठी यांत्रिक कंपोस्टिंगची सुविधा आहे. तसेच, बायोगॅस प्रकल्पात दररोज सुमारे पाच हजार किलो सेंद्रिय कचऱ्यावर प्रक्रिया करून ऊर्जानिर्मिती केली जाते.
टाउनशिपमधील तीन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांद्वारे दररोज सुमारे ४८ लाख लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जाते. हे प्रकल्प सौरऊर्जेवर चालतात. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर केल्याने गोड्या पाण्याची बचत होते.
औषधी वनस्पतींच्या बागा, सेंद्रिय शेतीचे भूखंड आणि सेंट्रल ग्रीन यांसारख्या हरित क्षेत्रांमधूनही पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन दिले जाते. २०२६ मध्ये ‘अल्गी ट्रीज’ ही संकल्पनाही राबविण्यात आली आहे. या यंत्रणांमधून दरवर्षी सुमारे १.५ टन कार्बन डायऑक्साइड शोषून घेणे आणि १.२ टन ऑक्सिजन निर्माण करणे अपेक्षित आहे. शहरी विकासासोबत पर्यावरणाची जबाबदारी जपण्याच्या अमनोराच्या प्रयत्नांची सीआयआयने या पुरस्कारातून दखल घेतली आहे.





