Pune : यंदाही “सेट’ परीक्षा पूर्वीप्रमाणेच

पुणे : विद्यापीठ व वरिष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापकांसाठी अनिवार्य असलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात “सेट’ दि. १५ जून रोजी होणार आहे. ती पूर्वीप्रमाणेच पारपंरिक म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
या संदर्भात विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डाॅ. ज्योती भाकरे यांनी गुरुवारी परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. ही तारीख निश्चित करण्यत्तसाठी सुकाणू समितीची बैठक गुरुवारी झाली. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आणि दोन विषय तज्ज्ञांच्या उपस्थितीत आॅनलाइन बैठक पार पडली. त्यात ४० व्सर “सेट’ परीक्षेच्या आयोजनाचा निर्णय घेण्यात आला.
या पूर्वी ही परीक्षा ४ मे रोजी घेण्यात येणार होती. मात्र, त्याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा होती. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी लागली. आता जून महिन्यात परीक्षा होणार आहे. या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक, अभ्यासक्रम व अन्य माहिती लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
येत्या दहा दिवसांत पात्र उमेदवारांकडून सेट परीक्षेसाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार ही परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून घेतली जाणार आहे. महाराष्ट्र व गोवा राज्यातील उमेदवारांनी ही परीक्षा होणार आहे.
ऑनलाइन परीक्षा कधी होणार
गेल्या तीन-चार वर्षांपासून “सेट’ परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यंदाही त्याची चाचपणी घेण्यात आली. शेवटी ही परीक्षा पूर्वीप्रमाणेच होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे “सेट’ परीक्षा “नेट’च्या धर्तीवर ऑनलाइन कधी होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





