Pune : गणेशमूर्तींचा यंदा होणार तुटवडा

अंजली खमितकर
पुणे – मे महिन्यापासूनच पावसाने मारलेला जोरदार ठिय्या आणि पीओपीच्या मूर्ती बनवण्यावरील उशिरा उठलेली बंदी या सगळ्याचा परिणाम गणेशमूर्ती बनवण्यावर झाला असून, जेमतेम दीड महिन्यांवर आलेल्या उत्सवात यंदा गणेशमूर्तींचा तुटवडा निर्माण होणार असल्याचा मूर्तिकारांचा अंदाज आहे.
यंदाचा गणेशोत्सव २७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. साधारणपणे मार्च- एप्रिल महिन्यापासून मूर्तिकार मूर्ती बनवण्यास सुरुवात करतात. जवळपास १५ मेपर्यंत सर्व मुख्य काम संपते आणि त्यानंतर मूर्ती रंगवण्याचे काम सुरू होते. मूर्ती बनविण्याचे काम जरी यंत्रवत होत असले, तरी त्या नैसर्गिकरीत्या वाळणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी लागणारा हवेतला कोरडेपणा यंदा सततच्या पावसामुळे मिळालाच नाही.
कितीही नाकारले तरी १०० टक्क्यांतील ९० टक्के मूर्ती या पीओपीपासूनच बनतात. १० टक्के मूर्ती शाडूपासून बनतात. घरगुती, छोट्या आकाराच्या मूर्ती शाडूपासून, तर मोठ्या आणि मंडळाच्या मूर्ती या पीओपीपासूनच बनवल्या जातात.
शाडूची मूर्ती ही जड असते, तसेच ती वाळायला खूप वेळ जातो. त्यामुळे शाडूपासून मोठ्या मूर्ती बनवल्या जात नाहीत. त्याचे काम आधीपासूनच सुरू केले जाते.
मात्र, पीओपीला न्यायालयानेच बंदी आणल्यामुळे छोट्या कारखानदारांनी त्याचे उत्पादनच केले नाही. पीओपी मिळणेही अत्यंत कठीण होते, त्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे लक्ष होते. त्यामुळे त्याचा साठाही कोणत्याच मूर्तिकार व्यावसायिकाला करता आला नाही. असे असताना आता नऊ जून रोजी पीओपीवरची बंदी उच्च न्यायालयाने उठवली आहे. मात्र, एवढ्या उशिरा हा निर्णय झाल्याने त्याचा काहीच उपयोग मूर्तिकार व्यावसायिकांना होणार नाही.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका
पीओपीपासून तयार केलेल्या मूर्तींची विक्री करण्यावर बंदी नसल्याची सुधारित भूमिका केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) नऊ जून रोजी उच्च न्यायालयात मांडली. तथापि, पीओपी मूर्तींच्या नैसर्गिक जलस्रोतातील विसर्जनाला मनाई कायम राहील, असेही सीपीसीबीने स्पष्ट केले आहे. या मूर्ती कृत्रिम हौदातच विसर्जित करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत.
वर्षभर पीओपीचे मूर्तींचे उत्पादन होते, ते यंदा झालेच नाही. दरवर्षी आजच्या तारखेपर्यंत आमचे बुकिंग ४० टक्के असते. मात्र, तुटवड्याच्या धास्तीने बुकिंग ७० टक्क्यांपर्यंत झाले आहे. यंदा पाऊस खूप झाला. पीओपीही आता उपलब्ध झाले आहे. त्यामुळे मूर्तीं बनवण्याचे काम युद्धपातळीवर करूनही ते होणार नाही. बाजारात गणेशमूर्ती कमी येतीलच; शिवाय त्याच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे.
किंबहुना कितीही पैसे दिले तरी मूर्ती मिळतील की नाही, हीच मुळात शंका आहे. दरवर्षी आमच्याकडे मोठ्या आकाराच्या ७० मूर्तींची ऑर्डर असते; परंतु यंदा आम्ही केवळ ३५ चेच बुकिंग घेऊ शकलो आहोत. एकतर त्यासाठी लागणारा माल पुरेसा नाही, शिवाय वेळही कमी राहिला आहे.- भालचंद्र देशमुख, मूर्तिकार





