Pune : प्राध्यापक भरतीसाठी स्वतंत्र आयोग नाहीच

पुणे : राज्यातील विद्यापीठांमध्ये सहायक प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी स्वतंत्र आयोग निर्माण करणे, हे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावलीचे उल्लंघन करणारे आहे. राज्यातील विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापक भरतीसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) प्रचलित नियमावलीचे आणि विद्यापीठ कायद्यातील तरतुदीचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्राध्यापक भरतीसाठी स्वतंत्र आयोगाची स्थापना करण्यासंदर्भात राज्यपाल कार्यालयाकडून करण्यात आलेली मागणी “यूजीसी’ने फेटाळली आहे.
राज्यातील बहुतांश विद्यापीठांची प्राध्यापक भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती. मात्र राज्यपाल कार्यालयाने सध्या सुरू असलेल्या प्राध्यापक भरतीला स्थगिती देण्याचे निर्देश दिले होते. तसेच याबाबत स्वतंत्र आयोग स्थापन करून भरती प्रक्रिया राबवावी, अशा प्रकारची भूमिका घेतली होती, याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाकडेही पत्रव्यवहार करण्यात आला होता.
त्यावर विद्यापीठ अनुदान आयोगाने राज्याच्या उच्च शिक्षण सचिवांना पत्र पाठवून स्वतंत्र आयोगामार्फत प्राध्यापक भरती करता येणार असल्याचे कळवले आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाने प्राध्यापक भरती संदर्भात स्वतंत्र नियमावली दिलेली आहे. त्या नियमावलीनुसारच प्राध्यापक भरती प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे.
विद्यापीठांनी यूजीसी नियमांमध्ये दिलेल्या तरतुदींचे पालन करून रीतसर स्थापन केलेल्या निवड समित्यांमधून सहाय्यक प्राध्यापक पदाची भरती प्रक्रिया राबवावी, असे स्पष्ट निर्देशने दिले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर विद्यापीठातील प्राध्यापक भरती लवकरच सुरु होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





