Pune : विधीमंडळात भाषा कशी वापरावी याचे भान राहिले नाही

पुणे : विधीमंडळात महिलांबाबत अपशब्द वापरण्यासारखे प्रकार झाले. काहींचा हिरोगिरी करण्याचा हेतू असू शकतो. मात्र, विधीमंडळात कशा प्रकारची भाषा वापरली पाहिजे, याचे सदस्यांना भान राहिलेले नाही, अशी खंत विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
विधीमंडळात झालेल्या कामकाजाविषयी माहिती देण्यासाठी बोलावण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या, विधान परिषदेत एकूण ११५ तास, तर विधानसभेत एकूण १४६ तास कामकाज झाले. विविध विषयांवर प्रश्नोत्तरे, चर्चा झाली. तसेच अहिल्याबाई होळकर जन्म त्रिशताब्दी, महिला पंचदशक पूर्ती निमित्त ठराव, राज्यघटनेला ७५ वर्षे या विषयावर ठराव करण्यात आले. लोकसभेसारखेच निकाल विधानसभेत येण्याची शक्यता होती. मात्र, तसे झाले नाही. पूर्वी सरकार स्थापनेनंतर दोन वर्षांनंतर विरोधी पक्षांची आंदोलने व्हायची. आता विरोधकांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली. काही लोकांनी गढूळ वातावरण केले.
महिलांचे राजकीय सक्षमीकरण आवश्यक आहे. त्यासाठी काही जिल्ह्यांत दौरा करून संबंधित विभागांच्या कामांचा आढावा घेणार असल्याचे डाॅ. गोऱ्हे यांनी सांगितले. मुंबईतील प्रश्नासंदर्भात तेथील आमदार अधिवेशात आग्रही दिसतात. तसे पुण्यातील आमदार दिसत नाहीत. त्यावर डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, स्वर्गीय गिरीश बापट पुण्याच्या सर्व आमदारांचे एकत्रित प्रश्न मांडत होते. आताही होईल, असे गोऱ्हे यांनी सांगितले.
लाडक्या बहिणींना २१०० रुपये अमुक एका वेळेला देऊ असे कोणीच सांगितले नव्हते. सरकारला ज्यावेळी शक्य होईल, त्यावेळी देतील, असे डॉ. निलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. …विधानसभेत सर्वच खोक्याभाई असल्याच्या राज ठाकरे यांच्या या वाक्यावरून हक्कभंग होऊ शकतो का, असे विचारले असता, ‘हे विधान हक्कभंगासाठी पात्र होऊ शकते. जर कोणत्या आमदाराला ते वाटले, तर तो हक्कभंग दाखल करू शकतो.





