Pune : …तर मग भाजपने शहरच विकायला काढावे : बागूल

पुणे –भाजपला महापालिकेच्या उत्पन्न वाढीबद्दल इतकेच प्रेम आहे, तर त्यांनी ऍमेनिटी स्पेसच कशाला, पुणे शहरच विकून टाकावे. म्हणजे त्यांचा मालामाल होण्याचा मार्ग मोकळा होईल, अशा शब्दांत मनपातील कॉंग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागूल यांनी भाजपवर टीका केली आहे.
नागरिकांना सुविधा उपलब्ध करण्यासाठी ऍमेनिटी स्पेस 30 वर्षांच्या भाडेकराराने देण्याचा निर्णय स्थायी समितीने नुकताच घेतला. यावर बागूल म्हणाले, ” हा निर्णय पुणेकरांच्या हिताविरुद्ध आहे. उत्पन्न वाढीसाठी म्हणून खोटे आकडे जनतेपुढे मांडून त्यातून शेकडो कोटी रुपये मिळणार आहेत, असा आभास ते निर्माण करत आहेत. जनहिताचे अनेक प्रकल्प होऊ शकत असतानाही विशिष्ट लोक आणि व्यावसायिकांच्या फायद्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेत कॉंग्रेस पक्ष सत्तेत असल्यापासून ऍमेनिटी स्पेस या नागरिकांच्या हितासाठी राखून ठेवलेल्या आहेत.
त्यावर आरक्षण नसले, तरी विविध नागरी हिताचे प्रकल्प तेथे उभारणे सहज शक्य असते. येथे अतिक्रमण होऊ नये, यासाठी दक्षता घ्यावी लागते. उत्पन्नवाढीच्या गोंडस नावाखाली या जागा 30 वर्षांसाठी हितसंबंधींना देण्याचे भाजपचे धोरण शहराच्या दृष्टीने चुकीचे व घातक आहे. त्यामुळे तातडीनं हा निर्णय रद्द करावा. अन्यथा वेळप्रसंगी न्यायालयात दाद मागण्याचीही आमची तयारी आहे.’





