Pune : अत्याचार पीडितेला पोलिसांचीच मारहाण

पुणे – अत्याचाराची तक्रार देणाऱ्या महिलेला पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक, तसेच महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. याबाबत पीडितेने तक्रार दिल्यानंतर समर्थ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक अर्जुन दिवेकर, दोन महिला हवालदार, दोन महिला पोलीस शिपाई, एक पुरुष शिपाई तसेच अक्षय आवटे ( ३१, रा. सोमवार पेठ), आदित्य गौतम (३०, रा. साततोटी चौक, कसबा पेठ), सुजीत पुजारी (रा. आंबेगाव बुद्रुक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेने अत्याचारप्रकरणी सुजीत, आदित्य यांच्याविरुद्ध मार्च २०२३ मध्ये तक्रार दिली होती.
पती अक्षय याने वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याचा आराेप तिने केला होता. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. “पोलिसांकडे तक्रार दिल्याने आरोपी चिडले. २३ मार्च २०२३ रोजी महिलेला समर्थ पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले. पती अक्षय, त्याचे मित्र पुजारी आणि गौतम यांनी शिवीगाळ करून धमकी दिली. महिला पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्यात बोलाविले.
पोलीस ठाण्यात मला उपनिरीक्षक आणि महिला पाेलीस कर्मचाऱ्यांनी पट्ट्याने मारहाण केली,’ असा आरोप महिलेने फिर्यादीत केला. “आरोपी पुजारी, गौतम हे सोमवार पेठेतील एका माजी नगरसेवकाचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी मला धमकावले,’ असा आरोप महिलेने केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील तपास करत आहेत.





