Pune: खेडकर कुटुंबांचा पाय आणखी खोलात

पुणे – पिस्तूलाचा धाक दाखवून मुळशीतील शेतकऱ्यांना दमदाटी केल्याची चित्रफीत व्हायरल झाल्यानंतर आयएएस पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्यासह सात जणांविरुद्ध पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे खेडकर कुटुंबाभोवती अडचणी वाढल्या आहेत.
याप्रकरणी मनोरमा खेडकर, दिलीप खेडकर (दोघे रा. नॅशनल हाऊसिंग सोसायटी, बाणेर), अंबादास खेडकर (रा. आंबी, ता. हवेली) यांच्यासह सातजणांविरुद्ध पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. खेडकर यांच्यासोबतच्या अंगरक्षकांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींमध्ये महिला अंगरक्षकांचा समावेश आहे.
याबाबत शेतकरी पंढरीनाथ कोंडिबा पासलकर (६५, रा. केडगाव, आंबेगाव पुनर्वसन, ता. दौंड, जि. पुणे) यांनी याबाबत पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची शेतकऱ्यांनी भेट घेतली. त्यानंतर पासलकर यांनी तक्रार दिली. त्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. खेडकर यांच्याकडे शस्त्र परवाना आहे का? याबाबत तपास कऱण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर शासकीय सेवेत असताना त्यांनी कोट्यवधी रुपयांची संपत्ती कमावली. अनेक ठिकाणी जमीन खरेदी केली असून मुळशी तालुक्यात २५ एकर जमीन त्यांच्या नावे आहे. तेथे शेजारच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर देखील त्यांनी अतिक्रमणाचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी विरोध केला.
तेव्हा पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या अंगरक्षकांना घेऊन तेथे आल्या. त्यांनी पिस्तूलाचा धाक शेतकऱ्यांना दाखवला. मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांचे पुणे-सोलापूर रस्त्यावरील दौंड तालुक्यात पुनर्वसन करण्यात आले आहे. काही शेतकऱ्यांच्या जमिनी मुळशी तालुक्यात आहेत.
खेडकरांच्या घरात भांड्याला भांडे लागले..
खेडकर यांच्या बाणेर येथील बंगल्यात भाड्यांची आदळआपट सुरू असल्याचा कॉल दुपारी पोलीस नियंत्रण कक्षाला आला होता. चतु:शृंगी पोलिसांनी तातडीने त्यांच्या घरी गस्तीवरील मार्शल पाठवले. मार्शलने घराबाहेर थांबून पडताळणी केली असता, त्याला आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. घराबाहेर मात्र माध्यमांच्या प्रतिनिधींची गर्दी होती.
दिलीप खेडकर होते बेपत्ता
दिलीप खेडकर हे जानेवारी महिन्यात दोन दिवस बेपत्ता होते. त्यांच्या पत्नीने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. मात्र, ते एका रिसॉर्टवर असल्याचे लक्षात येताच त्यांनी मिसिंगची केस दाखल केली नाही. या घटनेला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.





