Pune : पूल झाला आता सुशोभीकरणासाठी उधळपट्टी

पुणे : सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलाचे सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यावर महापालिकेने तातडीने सुशोभीकरणाची घाई केली आहे. पुलाच्या खालील बाजूस आकर्षक विद्युत रोषणाई करण्यासाठी तब्बल दीड कोटींची निविदा काढली आहे. पुलाच्या कामामुळे मुख्य रस्त्याची दुरावस्था झालेली असताना त्याचे काम उरकण्याऐवजी सुशोभीकरणासाठी उधळपट्टी करण्याची घाई नेमकी कोणासाठी हा प्रश्न आहे.
महिन्यापूर्वी प्रशासनाने पुलावरील विद्यूत व्यवस्था तसेच रोषणाईसाठी प्रथम ७५ लाखांची आणि त्यानंतर २५ लाखांची निविदा काढली होती. त्यानंतर आता पुन्हा दीड कोटींच्या निविदेची भर पडली आहे. शहराती रस्ते, ड्रेनेज, पदपथांची दुरवस्था असताना, पुलाच्या वरखाली रोषणाई करण्याची एवढी घाई का, असा सवालही उपस्थित होत आहे. सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी फनटाईम ते राजारामपूल हा उड्डाणपूल उभारला आहे.
पुलाचे काम तीन टप्प्यांत झाले असून, शेवटचा टप्पा शिवा काशीद चौक ते विठ्ठलवाडी हा असून तो आता वापरात आला आहे. लगेचच प्रशासनाने पुलाच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली खालील बाजूस विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तब्बल दीड कोटींची निविदा काढली. दुसरीकडे, शहरातील अनेक ठिकाणी विद्युत रोषणाईची कामे सुरू आहेत. त्यामुळे हा खर्च नक्की कोणासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
उधळपट्टीचा प्रकार
पुलाचे काम पूर्ण झाल्यानेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुलाचेउद्घाटन केले आहे. प्रशासनाने पुलाच्या खालील बाजूचा रस्ता तातडीने दुरुस्त करणे आवश्यक होते. मात्र, त्यासाठी पैसा नसलेली पालिका गरज नसतानाही उड्डाण पुलाखालील बाजूस दीड कोटींची विद्युत रोषणाई करणार आहे. हा केवळ उधळपट्टीचा घाट असल्याची टीका शिवसेना (ठाकरे गट) खडकसवाला विभाग प्रमुख महेश पोकळे यांनी केली.





