पुणे : ‘आयसर’मधील प्रवेश परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

पुणे –मूलभूत विज्ञानासाठी नावाजलेली संस्था असलेली इंडियन इन्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन आणि रीसर्च अर्थात “आयसर’मधील प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली. अर्ज करण्यास लिंक खुली करण्यात आली आहे.
देशभरात पुण्यासह ब्रह्मपूर, भोपाळ, मोहाली, कोलकत्ता, तिरूअंनतपुरम, तिरुपती येथे आयसरचे संकुले आहेत. येथील पदवी आणि पदव्युत्तर इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही प्रवेश परीक्षा देशभरात घेण्यात येणार आहे. बारावी किंवा समकक्ष अभ्यासक्रमानंतर विज्ञान शाखेतील विद्यार्थी आयसरमध्ये प्रवेशासाठी पात्र ठरतात. पाच वर्षाच्या बॅचलन इन सायन्स-मास्टर इन सायन्स (बीएस-एमएस) अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. आयसर भोपाळमध्ये चार वर्षाचा अभियांत्रिकी आणि अर्थशास्त्रातील पदवी अभ्यासक्रमाही उपलब्ध आहे. खुला व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 60 टक्के, तर अपंग, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 55 टक्के गुण प्रवेशासाठी आवश्यक आहे. प्रवेशाची सर्व माहिती आयसरच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
आयसर प्रवेश परीक्षेसाठी अर्ज : 29 एप्रिलपासून
प्रवेश परीक्षेसाठी अंतिम मुदत : 29 मे
प्रवेश परीक्षेची तारीख : 3 जुलै





