पृथ्वीराज सुतार, संजय भोसले यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश पुणे – उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातील पृथ्वीराज सुतार, संजय भोसले यांनी कार्यकर्त्यांसह मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप कार्यालयातील कार्यक्रमावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी उपस्थित होते. पृथ्वीराज सुतार यांचे वडील शशिकांत सुतार कोथरूडमधून विधानसभेवर गेलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. तसेच, ते शिवसेनेकडून तत्कालीन सत्तेत कृषिमंत्री राहिले आहेत. तर भोसले येरवडा येथून शिवसेनेच्या तिकिटावर महापालिकेत निवडून आले होते. येरवड्यात काँग्रेसचे अस्तित्त्व संपवून आम्ही तीन जागांवर भगवा फडकवला. या स्थितीत आम्हाला काँग्रेसच्या दारात जागांसाठी भीक मागावी लागते. आमच्या जागांवर काँग्रेसने दावा केला आहे, यामुळे आम्ही भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे संजय भोसले यांनी सांगितले. कोथरूडमध्ये ४० वर्षे सुतार परिवार काम करत आहे. भाजपची आम्हाला साथ मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर भारताला एकत्र केले. त्यांचा विकासाचा अजेंडा पाहून आम्ही भाजपमध्ये प्रवेश केल्याचे पृथ्वीराज सुतार यांनी सांगितले. हिंदुत्वाच्या मुद्यावर काम करायचं असेल तर भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष आहे. यामुळेच शिवसैनिकांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत एकत्रित काम करून महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवू. सावत्र भावाकडे गेलो, अशी वागणूक मिळणार नाही. पक्षातील निष्ठावंतावरही अन्याय होणार नाही, असे केंद्रीय मंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.