pune : एकतानगरीसाठी पुढील आठवड्यात निविदा

पूरस्थिती रोखण्यासाठी काठ सुधार प्रकल्प राबवण्यात येणार
पुणे – खडकवासला नदीतून मुठानदीत पाणी सोडल्यानंतर पूरस्थिती उद्भवणाऱ्या एकतानगरीमधील पूरस्थिती रोखण्यासाठी काठ सुधार प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठीच्या निविदा पुढील आठवड्यात काढल्या जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. नदीकाठ विकसन प्रकल्पाच्या सहाव्या टप्प्यात शिवणे ते राजारामपूलपर्यंत नदीकाठच्या दोन्ही बाजूला हा प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ४५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
मागील वर्षी अतिवृष्टीमुळे खडकवासला साखळी धरणातील साठा वाढल्याने धरणांमधून विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे सिंहगड रस्त्यावरील मुठा नदीलगतच्या एकतानगरी, विठ्ठलनगरी, निम्बजनगरी येथील सखल भागातील इमारती आणि वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर पुराच्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यावेळी राज्यातील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी या परिसराला भेट तातडीने पूरस्थितीवर उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या.
महापालिकेकडून सध्या नदीकाठ सुधार प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यापैकी मुठा नदीवरील वडगाव खुर्द ते राजाराम पूल या भागाचा स्ट्रेच-६, या सुमारे ४.१० किमी लांबीचा भाग समाविष्ट आहे. नदीकाठ सुधार प्रकल्पाच्या उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट पुराच्या पाण्यापासून लगतच्या वस्ती व भागाचे संरक्षण करणे हे देखील आहे. तसेच, गतवर्षीच्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकतानगरी परिसरात कामे केली जाणार आहेत.
नदीकाठ विकसन व संवर्धन प्रकल्प राबविल्याने नदीची पूरवाहन क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. यामुळे नदीकाठी असलेला रहिवासी भाग सुरक्षित होणार आहे. वडगाव खुर्द ते राजाराम पूल या दरम्यानच्या नदीच्या ४.१० किमी लांबीतील दोन्ही काठांवरील भागांमध्ये तांत्रिक कामे करणे, नागरिकांना चालण्यासाठी पायवाट व घाट विकसित करणे आणि सुशोभीकरण करणे यांचा समावेश आहे. या कामासाठी अंदाजे ३०० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित होता. परंतु, तपशिलवार पूर्वगणनपत्रकानुसार कामासाठी संभाव्य भाववाढ, रॉयल्टी व कररचनेतील बदल गृहीत धरून रु. ३६९.७५ कोटी रुपये अधिक (जीएसटी, रॉयल्टी व टेस्टिंग चार्जेससह) असे एकूण ४४९.९१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
प्रकल्पातील महत्वाच्या बाबी
-नदीच्या प्रवाहासाठीच्या भिंती ९० मीटरपर्यंत रूंद करणार
– एकतानगरी परिसरात असलेल्या नाल्याला सीमाभिंत बांधली जाणार.
– पावसाच्या पाण्यासाठी स्वतंत्र ८०० मीटर पावसाळी वाहिनी टाकणार
– पाणी वाढल्यास जॅकवेल करून पाणी काढणार
– पूर्ण प्रकल्पात ४ ठिकाणी घाट, ४ ठिकाणी रॅम्प तर दोन ठिकाणी डेक असणार
– स्वतंत्र पादचारी तसेच सायकल ट्रॅकची सुविधा





