Pune Temperature – हवामान बदलामुळे तीन ते चार दिवसांपासून ३४ ते ३५ अंशावर असलेला उष्णतेचा पारा शुक्रवारी (दि. १०) ३८ अंशावर पोहचला. गेल्या २४ तासांत कमाल तापमानात दोन ते अडीच अंशाने तापमानात वाढ झाल्यामुळे शुक्रवारी दुपारनंतर उन्हाचा चांगलाच चटका जाणवत होता. कोरेगाव पार्क येथे सर्वाधिक ३८.१ तर शिवाजीनगर, हडपसर आणि वडगावशेरी येथे पारा ३६ अंशाच्या पुढे नोंदविला आहे. अवकाळीच्या विश्रांतीनंतर कमाल तापमान पुन्हा चाळीशी गाठेल, अशी शक्यता होती. सततच्या हवामान बदलामुळे मागील तीन ते चार दिवसांपासून कमाल व किमान तापमानात फारसा बदल झालेला नाही. कमाल- किमान तापमानातही कमी-अधिक वाढ होत असल्याने दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरण तर रात्री व पहाटे हवेत गारवा असे वातावरण पुणेकर अनुभवत होते. शुक्रवारी दुपारी वाढत्या कमाल तापमानामुळे उन्हाचा चटका हळूहळू वाढू लागला आहे. दिवसभर दोन ते अडीच अंशाने कमाल तापमानात वाढ झाली. त्यामुळे उन्हाचा चटका आणि उकाडा चांगलाच जाणवत होता. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यातील हवामान कोरडे राहील. कोरेगाव पार्क ३८.१, तळेगाव ३७.१, शिवाजीनगर ३७, वडगावशेरी ३६.९, हडपसर ३६.६, चिंचवड ३६.५, बारामती ३६.४, राजगुरूनगर ३६.२, मगरपट्टा ३६.१, पाषाण ३५.६, हवेली ३५.५, एनडीए ३५.१ अंश सेल्सिअस