पुणे : “सध्या आर्टिफिशियल इंटलिजन्सचे (एआय) युग आहे. पण, तंत्रज्ञान घोड्यासारखे असते. त्याला घाबरून चालणार नाही आणि नाकारून सुद्धा चालणार नाही. तंत्रज्ञानावर ठाण मांडून बसायचे आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग प्रसार आणि प्रचारासाठी करून, मराठीला ज्ञान भाषेत परावर्तीत करण्याचा प्रयत्न करतोय,’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विश्व मराठी संमेलनाचे उद्घाटन समारंभात ते बोलत होते. “वेबसाइटवर सर्व साहित्य उपलब्ध करून देण्याऐवजी स्मॉल लॅंग्वेज मॉडेल तयार करावे. त्यात सर्व साहित्यिकांचे साहित्य टाकले पाहिजे. चॅट-जीपीटीला प्रश्न विचारतो, तसा एक प्रश्न या मॉडेलला विचारल्यास संबंधित सर्व माहिती एका क्लिकवर मिळू शकेल. मराठी भाषा विभागाने हा प्रयोग करावा. त्या माध्यमातून पुढच्या पिढीसाठी अभिजात साहित्य कसे पुढे घेऊन जाता येईल, याचा विचार करावा लागेल,’ असेही फडणवीस यांनी सुचवले. दिल्लीतील मराठी शाळेला मदत करणार : पवार मराठी भाषेवर, मराठी साहित्यावर आणि मराठी संस्कृतीवर प्रेम करणारी, महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल स्वाभिमान बाळगणारी माणसे जगाच्या कानाकोपऱ्यातून या संमेलनासाठी आली. परदेशातूनही मराठीप्रेमी येथे आले आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने मराठी भाषेसाठी योगदान देत असतो, असे पवार म्हणाले. तसेच दिल्लीतील मराठी शाळेला महाराष्ट्र सरकारकडून मदत केली जाईल, अशी ग्वाही पवार यांनी यावेळी दिली. मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी कार्य करणार : शिंदे “मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, हा राज्यातील जनतेच्या अस्मितेचा विषय आहे. आपल्या भाषेत उत्तम साहित्य निर्माण होते, हे आपण दाखवून दिले आहे. आम्ही राजकीय कार्यकर्ते, तसेच भाषेचेही कार्यकर्ते आहोत. आम्ही मराठी भाषेसाठी जे जे काही करता येईल, ते आम्ही सरकारच्या माध्यमातून करू,’ असे शिंदे म्हणाले. विश्व संमेलनाला “मी पुन्हा येईन…’ जगाच्या पाठीवर एकही असा देश नाही जिथे मराठी माणूस पोहचला नाही. आम्ही दावोसला गेलो, तिथे मराठी माणसे स्वागतासाठी आली होती. यावेळी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हे गाणे ऐकल्यावर आनंद झाला. मराठी माणूस इतक्या वर्षांपासून बाहेर असला तरीही माय मराठीपासून दुरावलेली नाही. त्यांच्या मनात मराठी असून पुढच्या पिढीपर्यंत भाषा पोहचवण्याचे काम करत आहेत. मी कुठेही गेलो तरी “पुन्हा येईन,’ असे म्हटले जाते. अलिकडच्या काळात याला चांगल्या अर्थाने म्हटले जात आहे. शेवटी एखाद्या शब्द चिकटला, तर काळ आणि वेळेप्रमाणे त्याचे अर्थ बदलत जातात. जेव्हा जेव्हा विश्व संमेलन होईल त्यावेळी “मी पुन्हा येईन,’ असे फडणवीस म्हणाले. मराठी टिकविणे ही आपली जबाबदारी : सामंत सांस्कृतिक नगरी असलेल्या पुण्यात अभिजात दर्जा मिळाल्यानंतर विश्व मराठी संमेलन होत आहे. मराठी भाषा विभागाचा कार्यक्रम पुणेकरांनी उचलून धरला आहे. मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार-प्रसार झाला पाहिजे, त्यासाठी मराठी ही शाळा-महाविद्यालयांपर्यंत पोहोचली पाहिजे. शोभा यात्रेत सात ते आठ हजार विद्यार्थी सहभागी झाले पाहिजे. युवा पिढीची जबाबदारी आहे, की मराठी टिकविणे आणि आक्रमणाचा आक्रमकतेने प्रतिकार केला पाहिजे. मराठी टिकविणाऱ्यांचा आदर्श हा दीपस्तंभाप्रमाणे ठेवला पाहिजे. पुढील वर्षी मालगुंडला पुस्तकाच्या गावाचा दर्जा दिला जाईल. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. महाराष्ट्रातील अशी गावे शोधली जातील, त्यामध्ये मराठी जतन-संवर्धन करणाऱ्या व्यक्तीचे गाव पुस्तकांचे गाव केले जाईल, असे मंत्री उदय सामंत म्हणाले.