Pune : टाकी तयार, पण पाणी नाही

पुणे : धायरी परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी हायब्लीज सोसायटी परिसरात सुमारे ३५ लाख लीटर साठवण क्षमतेची टाकी उभारण्यात आली आहे. या टाकीला जोडलेल्या जलवाहिनीची चाचणीही झाली आहे. परंतु, त्यानंतरही पालिकेकडून पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना खासगी टॅंकरचा आधार घ्यावा लागत आहे. या टाकीला महापालिकेच्या वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जाणार आहे.
महापालिकेकडून समान पाणीपुरवठा योजने अंतर्गत गारमाळ, गणेश नगर, शेवटचा बसस्टॅप, बेनकर वस्ती, पारी कंपनी आणि परिसराला या टाकीतून पाणी दिले जाणार असून जवळपास एक लाख नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे.
डीएसके पायथा तसेच हायब्लीज सोसायटी येथील टाक्यांची कामे पूर्ण झाली असून त्यातील हायब्लीज सोसायटीच्या टाकीला जलवाहिनी जोडली असल्याने जानेवारी महिन्यांतच या टाकीत पाणी सोडणे अपेक्षित असताना अद्यापही ती बंद असल्याने स्थानिक नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. शिवसेनेचे महेश पोकळे यांनी ही टाकी तातडीने सुरू करण्य़ाची मागणी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
चाचणीतच गढूळ पाणी…
येथे बांधण्यात आलेल्या टाकीची चाचणी घेण्यात आली तेंव्हा नव्याने जोडलेल्या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात गढूळ पाणी आले. त्यामुळे यातून जीबीएस वाढण्याची भिती असल्याने टाकी तयार असली तरी महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे टाकी आणि जलवाहिनीची स्वच्छता करून पालिकेने शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.





